पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात रविवारी सलग दुसर्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. खडकवासला धरण साखळीतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शहरातील काही भाग पुन्हा जलमय झाला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील बहुतांश धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.
खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारी रात्री धरणातून साधारण 35000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. त्यामुळे डेक्कन परिसरातील पुलाची वाडीमधील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.
गेल्या तीन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड उपनगरांसह मावळ पट्ट्यात सतत बरसत असलेल्या जलधारांचा जोर रविवारीही कायम राहिला. सततच्या पावसाने शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी ग्रामीण भागातील भातशेतीसाठी हा पाऊस दिलासादायक असल्याने शेतकरी आनंदात आहेत. धरणे, नद्या, ओढे, नाले जलमय झाले आहेत. पवना, इंद्रायणी, मुळा, मुठा आणि उपनद्यांच्या परिसरातील धरणांच्या पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या भागातील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. रेल्वेच्या दूरपल्ल्याच्या गाड्या मात्र वेळेवेर धावत आहेत.
जिल्ह्यात रविवारी पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे भोर तालुक्यातील निरा देवघर धरण शंभर टक्के भरले. भाटघर, वीर धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. वीर धरणातूनही सायंकाळी साडेसात वाजता 63 हजार 273 क्युसेकने निरा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे निरा नदीला पूर आला आहे. नदी काठच्या नागरिकांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला साखळीतही जोरदार पाऊस सुरु होता.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश विदर्भातील अनेक ठिकाणी 100 मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. रविवारी सकाळी आठपर्यंत खानदेशातील चिंचपाडा येथे सर्वाधिक 198 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. कोकणात मागील दोन दिवसांपासून धुवाँधार पाऊस पडत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. दरम्यान 28 ऑगस्टनंतर पाऊस ओसरणार असल्याचे हवामान विभागातील सूत्रांनी सांगितले.