पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि शेतकरी संघटना यांच्यासह इतर पाच संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येऊन ‘महाशक्ती परिवर्तन आघाडी’ची घोषणा गुरुवारी केली. राज्यात सर्व 288 जागांवर सक्षम उमेदवार देणार, अशी घोषणा आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केली. या आघाडीमुळे राज्यातील मतदारांपुढे तिसरा सक्षम पर्याय उपलब्ध झाला असल्याचे या नेत्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, मी आता इथेपर्यंत आलो आहे, याचा अर्थ महायुती सोडली, असल्याचे बच्चू कडू यांनी जाहीर केले.
तिसरी आघाडी स्थापनेच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. पुण्यात तिसर्या आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीस संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासह स्वतंत्र भारत शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य समिती या संघटनेचे नेते अनुक्रमे शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणूक आणि राज्यातील एकूणच राजकीय स्थिती याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
राजू शेट्टी म्हणाले, दोन बड्या नेत्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना तिसर्या आघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकत्र येताना किमान समान कार्यक्रमावर सर्वांनाच काही मुद्दे सोडावे लागतील. महाराष्ट्रात सत्ताधार्यांनी काय दिवे लावलेत ते जनतेला माहीत आहे. आम्ही राज्यात परिवर्तन करण्यासाठी एकत्र येत आहोत. तिसर्या आघाडीत सामुदायिक नेतृत्व असणार आहे. राज्यातील विविध संघटना, चळवळीतील कार्यकर्ते यांनाही या आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
संभाजीराजे म्हणाले, राज्यातील मतदारांना निवडीचा चांगला पर्याय द्यावा, या हेतूने परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली आहे. मूलभूत प्रश्नांवर कोणताही राजकीय पक्ष बोलत नाही. तिसरी आघाडी स्थापन होणे हा ऐतिहासिक निर्णय आहे. आघाडीत निर्णय घेण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याचा सात-बारा महाविकास आणि महायुती या राजकीय आघाड्यांच्या नावाने लिहून ठेवला आहे काय? असा सवालही त्यांनी केला.
बच्चू कडू म्हणाले, विधानसभा निवडणुका कोणत्या चिन्हावर लढवायच्या, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. मात्र, या आघाडीत धार्मिक कट्टरवादी पक्षांना यायचे असेल तर त्यांना कट्टरता कमी करावी लागेल. स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप यांनी सांगितले की, येत्या 26 सप्टेंबर रोजी परिवर्तन महाशक्तीच्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा लक्षात घेता, प्रस्थापित आघाड्यांना एक आश्वासक पर्याय देण्याचा निर्णय व निश्चय आजच्या बैठकीत झाला. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर यांच्यासह सर्व पक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
मी महायुतीतून बाहेर पडलो आहे, हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथे आलो आहे, म्हणजेच महायुती सोडली, असे म्हणत बच्चू कडू यांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, राज्यातून काँग्रेस आणि भाजपला उखडून फेकण्याचे दिवस जवळ आले आहेत. अजूनही शेतकरी व शेतकर्यांच्या मुलांना मानसन्मान मिळत नाही. शेतकर्यांवर अजूनही आत्महत्या करण्याची वेळ येते. त्यामुळे त्यांच्यात सूड घेण्याची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही बदला घेणारी असेल, यात शंका नाही.