सत्तर लाख नागरिकांच्या सुरक्षेसाठी नऊ हजार पोलिस तैनात आहेत. एकादी जादूची कांडी फिरवली आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असं होत नाही. मात्र, आम्ही आमची जबाबदारी टाळत नाही. त्यासाठी आपण आमचे कान आणि डोळे बना. सध्या गरज आहे तुम्हीदेखील जागृत होण्याची. तुमच्या आजूबाजूला समाजात अपप्रवृत्ती दिसत असेल, समाजकंटक किंवा वाईट घटना घडत असेल, तर तुम्ही तत्काळ पोलिसांना माहिती द्या. आम्ही तुम्हाला आश्वासन देतोय येथे रावणराज नाही, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची ग्वाही देत आपणच आपलं पहारेकरी असलं पाहिजे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणेकरांना केले आहे.
स्वारगेटमधील गणेश कला क्रीडा मंचमध्ये पोलिस आयुक्तालयाच्या वतीने ‘शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी व महिलांची सुरक्षितता’ या विषयावर शाळा सुरक्षा परिषद आयोजित केली होती. त्या वेळी शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना मार्गदर्शन करताना अमितेश कुमार बोलत होते. याप्रसंगी, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, मनोज पाटील, सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आदी उपस्थित होते.
शिक्षकेतर कर्मचार्यांच्या नियुक्तीच्या करताना नियमित कर्मचार्यांबरोबरच बाह्य स्रोतांद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने केल्या जाणार्या नेमणुकांबाबत शाळा व्यवस्थापनामार्फत काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलिस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहणार आहे. शाळा परिसराच्या शंभर यार्ड अंतरावर कोणत्याही प्रकारची तंबाखू, गुटखा विक्री करणार्या टपरी असता कामा नये यासाठी तुम्ही स्वतः शाळेपासूनचे अंतर सुनिश्चित करून यावर लक्ष ठेवून नजीकच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी... अशा अनेक बाबींचा आयुक्त अमितेशकुमार यांनी ऊहापोह केला.
पोलिस आयुक्तांनी केलेल्या मार्गदर्शनांतर एका प्राचार्यांनी आपले मत मांडले, ते म्हणाले पालक हे केंद्रबिंदू ठेवून योजना राबवावी. आम्ही काम करत असताना, अनेकदा पालकांचा सपोर्ट मिळत नाही. काम करताना आम्हाला अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आम्ही शिक्षकदेखील सुरक्षित नाहीत असे त्यांनी म्हटले. त्या वेळी अमितेश कुमार म्हणाले, कायदेशीर कामाची अंमलबजावणी करत असताना कोणी, अडचणी निर्माण करत असेल आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
बदलापूरमध्ये शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित केली होती. पोलिस आयुक्तांनी शाळांमध्ये जनजागृती बरोबरच शाळा प्रशासनाला अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. पोलिसांकडून भरोसा सेलमार्फत चालणार्या पोलिस काका आणि पोलिस दीदी, दामिनी मार्शल, बडी कॉप, जेष्ठ नागरिक, बाल सुरक्षा पथकामार्फत चालणार्या कामाची माहिती दिली. त्याचबरोबर बालकांच्या सुरक्षेसंदर्भात असलेल्या कायद्यांची माहिती देण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याचे सादरीकरण केले