शहरात सलग तिसर्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी पावसाने शहराला झोडपून काढले. त्यामुळे कमाल तापमान चक्क 31 अंशांवरून 21 अंशांवर खाली आल्याने वातावरणातील गारवा वाढला आहे. दरम्यान, आज बुधवारी (दि. 25) शहराला ’रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहरात पाऊस पडलाच नाही. त्यामुळे वातावरण शुष्क अन् कोरडे झाले होते. 8 सप्टेंबरपर्यंत शहरात चांगला पाऊस झाला. त्यानंतर अधूनमधून फक्त रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे कमाल तापमान 31 ते 34 अंशांपर्यंत गेले होते. 22 रोजीच शहरात जोरदार पावसाने दाणादाण उडवून दिली. त्यानंतर पुन्हा 23 रोजीही जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच, 24 रोजी मंगळवारी दुपारी 1 ते 2 आणि 3 ते 4 या वेळेत शहरात मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली.
विजांच्या कडकडाटांसह शहरात मंगळवारी पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली. शहरातील सर्वच पेठा, उपनगरांत पावसाचे पाणी जोरात वाहत होते. मगरपट्टा, वडगाव शेरी, हडपसर, कोरेगाव पार्क, लवळे, पाषाण, चिंचवड या भागांत जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस वडगाव शेरीत 37.5 मिमी इतका झाला.
आज बुधवारी (दि. 25) घाटमाथ्यासह संपूर्ण जिल्ह्याला ’रेड अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे पुणे शहरातही सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शहरात 60 ते 100 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. तसेच, 26 व 27 रोजी शहरात ‘यलो अलर्ट’ म्हणजे 20 ते 30 मिमी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र पाऊस कमी होत आहे.
यंदाच्या हंगामात 1 जून ते 24 सप्टेंबरपर्यंत 968.5 मिमी इतका पाऊस झाला आहे. मागच्या वर्षीच्या हंगामात फक्त 431 मिमी इतका पाऊस झाला होता. तर, 2019 मध्ये 1100 मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर यंदा सर्वाधिक पाऊस मान्सून हंगामात नोंदला गेला आहे.
लोणावळा : 70, तळेगाव ढमढेरे 66.5, हडपसर 33.5, इंदापूर
25.5, भोर 23, लवळे 22, एनडीए 22, वडगाव शेरी 17.5, पाषाण 16, हवेली 15, तळेगाव 14, नारायणगाव 13.5, मगरपट्टा 11, खेड 10.5, चिंचवड 9.5, राजगुरुनगर 8.5, बारामती 6.2, कोरेगाव पार्क 6, माळीण 6