पुणे : उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे महापालिकेतून वगळण्याच्या निर्णय नगर नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे तो रद्द करावा आणि पूर्व भागांसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी भूमिका विविध नगररचनातज्ज्ञांनी मांडली आहे
महापालिकेत ऑक्टोबर २०१७ मध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील उरुळी देवाची आणि फुरसुंगीला महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषदा स्थापन करण्याची अधिसूचना काढली आहे. महापालिकेच्या हद्द बदलण्यापासून ते प्रभाग रचनेपर्यंतची सर्व परिस्थिती बदलणार आहे. नगररचना दृष्टीने या निर्णयाच्या होणाऱ्या परिणामांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ रामचंद्र गोहाड यांनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, महापालिकेची लचकेतोड करणे चुकीचे आहे. मूळ हद्दीतील गावांचा अशा ठिगळ पध्दतीने स्वतंत्र संस्थेमार्फत एकात्मिक विकास होणार नाही. एकात्मिक पद्धतीने विकास व्हायला पाहिजे. अन्यथा, सगळ्यांच ग्रामपंचायतींच्या नगर परिषदा कराव्या लागतील. पालिका हद्दीतून गावे वगळण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. नागरी सुविधा आणि समन्वित विकासाला खिळ बसेल. त्यामुळे गावे वगळण्यापेक्षा पूर्वभागातील गावांसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करणे आवश्यक असल्याचे गोहाड यांनी सांगितले.
उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावे महापालिकेतून वगळण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. माजी नगरसेवक गणेश ढोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत निवेदन दिले आहे. येथील ग्रामस्थांची केवळ वाढीव कराला विरोध होता. नगर परिषदेच्या माध्यमातून गावांचा विकास होऊ शकणार नाही. राजकीय हेतूने मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तो रद्द करावा, अशी मागणी ढोरे यांनी केली आहे.