

पुणे : शहरामध्ये अनधिकृत फ्लेक्स बोर्ड आणि बॅनरविरोधात महापालिकेची मोहीम तीव केली असून शुक्रवारी (दि. 3) पहाटेपासून सुरू करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 2500 हजार अनधिकृत फ्लेक्स बोर्ड आणि बॅनर हटविण्यात आले आहेत. ही कारवाई 15 क्षेत्रीय कार्यालयांत राबविण्यात आल्याची माहिती, उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.(Latest Pune News)
शहरात जागोजागी फ्लेक्स लावण्यात आले आहे. यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण झाले आहे. या विरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या पथकांनी शुक्रवारी सकाळपासून रात्रीपर्यंत मोहीम हाती घेत शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणांवरील बॅनर काढले.
या पुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. महापालिकेने इशारा दिला आहे की, यापुढे जे अनधिकृत बॅनर किंवा बोर्ड लावले जातील, त्यांच्यावर केवळ काढून टाकण्याची कारवाई न करता गुन्हा दाखल करून दंड आकारण्यात येईल, असेही जगताप यांनी सांगितले.