पिंपरी : बदलापूर येथील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असताना निगडी येथे एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीशी चाळे केल्याची माहिती समोर आली आहे. सहा वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच शाळेतील तेरा वर्षाच्या मुलीशी त्याने अश्लील चाळे केले. या शिक्षकाला निगडी पोलिसांनी अटक केली असून निवृत्ती देवराम काळभोर (रा. चिंचवड) असे या विकृत शिक्षकाचे नाव आहे. एकदा गुन्हा दाखल होऊनही शिक्षकाला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यासह ट्रस्टचा अध्यक्ष आणि इतरांवरही पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.
निवृत्ती काळभोर याच्यासह शाळेचे प्राचार्य अशोक जाधव, शाळेच्या ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभिम जाधव, अविंद्र अंकुश निकम, गोरख सोपान जाधव, हनुमंत दादा निकम आणि शुभांगी अशोक जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर लक्ष्मण नामदेव हेंद्रे हा पसार आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील एका शाळेत पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी काळभोर हा शाळेत खेळाचा शिक्षक आहे. काळभोर हा पिडीत मुलीस वारंवार त्रास देत होता. पिडीत मुलीच्या वर्गातील विदयार्थ्यांना पिटीच्या क्लाससाठी ग्रांउडवर घेवून जाताना व येताना पिडीत मुलीशी अश्लील चाळे करीत होता. हा प्रकार कोणाला सांगितला तर मार खाशील, अशी धमकी आरोपीने दिली होती. दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी पिडीत मुलगी वॉशरूमवरून बाहेर येत असताना काळभोर याने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन केले. अखेर मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.
निवृत्ती काळभोर याच्याविरुध्द निगडी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये शाळेतीलच एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयामध्ये काळभोर हा न्यायालयातून जामिनावर बाहेर आला होता. तरीसुध्दा त्याला शाळा व्यवस्थापनाने पुन्हा शाळेत नोकरी दिली. काळभोर यांच्यासारखा विकृत वृत्तीचा व्यक्ती तुरुंगात होता, हे माहित असताना देखील शाळा व्यवस्थापनाने त्याला पुन्हा शाळेत नोकरीवर घेतले. म्हणून शिक्षक निवृत्ती काळभोर याच्यासह शाळेचे प्राचार्य अशोक जाधव, तसेच ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास जाधव यांच्यासह इतर आरोपींना निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे.
आरोपी शिक्षक हा विकृत मानसिकतेचा आहे. दरम्यानच्या काळात त्याने पीडित मुलीसह आणखी काही मुलींशी लैंगिक चाळे केले असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सर्व मुलींना विश्वासात घेऊन चौकशी सुरू आहे.