

पुणे : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. केंद्र सरकारने राज्यातील 9 जिल्ह्यांचा यात समावेश केला आहे. (Latest Pune News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि.11) या कार्यक्रमाची सुरुवात होत असून राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
शनिवारी महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सकाळी 10 वाजता संपन्न होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना जाहीर केली असून, या योजनेमध्ये कमी उत्पादकता असलेले, कमी सिंचन क्षमता असलेले, कृषी कर्जाची उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांची निवड केंद्राने केली आहे.
महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांची निवड झाली आहे. यात पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या 9 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिहं चौहान यांचे भरणे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https:///pmindia web cast. nic. in लिंकद्वारे करण्यात येणार आहे. तरी राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.