

पिंपरी: अमेरिका व इराण यांच्यातील युद्ध परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेल्या इंधनपुरवठ्याच्या अडचणींचा परिणाम आता स्थानिक व्यावसायिक क्षेत्रावरही दिसून येत आहे. शहरात व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी पर्याय म्हणून तंदूर भट्ट्यांचा वापर सुरू केला आहे. वाढत्या मागणीमुळे तसेच वाहतूक खर्चामुळे तंदूर भट्ट्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून, काही प्रकारच्या भट्ट्यांचे दर दुपटीपर्यंत वाढल्याची माहिती उत्पादक आणि विक्रेत्यांनी दिली आहे.
यापूर्वी तंदूर भट्ट्यांमधून निघणार्या धुरामुळे प्रदूषण वाढत असल्याच्या कारणावरून त्यांचा वापर मर्यादित करण्यात आला होता. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी गॅसवर आधारित स्वयंपाक प्रणाली स्वीकारली होती. मात्र सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा अनियमित होत असल्याने आणि उपलब्धतेमध्ये घट झाल्याने हॉटेलचालक पुन्हा तंदूर भट्ट्यांकडे वळत आहेत.
स्थानिक बाजारात तंदूर भट्ट्यांची मागणी गेल्या काही महिन्यांत लक्षणीयरीत्या वाढली आहे. नव्याने हॉटेल सुरू करणार्यांसह व्यावसायिकदेखील भट्ट्यांची खरेदी करत असल्याने उत्पादकांवर उत्पादन वाढविण्याचा दबाव निर्माण झाला आहे. परिणामी कच्चा माल, वाहतूक आणि मजुरी खर्च वाढल्याने भट्ट्यांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
वाहतूक खर्चातही वाढ
तंदूर भट्टीसाठी लागणारी विशेष चिकणी माती मध्य प्रदेशातून आणावी लागते. स्थानिक पातळीवर ही माती उपलब्ध होत नसल्याने, वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅसचा तुटवडा कायम राहिल्यास आगामी काळात तंदूर भट्ट्यांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे हॉटेल व्यवसायाचा खर्च वाढणार असून त्याचा परिणाम खाद्यपदार्थांच्या दरांवरही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते, गॅस पुरवठा सुरळीत होईपर्यंत तंदूर भट्ट्यांच्या किमतींमध्ये वाढीचा कल कायम राहू शकतो.
भट्टीसाठी आवश्यक साहित्य महागले
तंदूर भट्टी तयार करण्यासाठी लागणार्या विविध साहित्यांच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. भट्टी तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारची माती, गूळ आणि चुना यांचा वापर केला जातो. या सर्व घटकांच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होत आहे.
भट्ट्यांचे दर
तीन हजार रुपयांपासून ते चाळीस हजार रुपयांपर्यंत दर आहेत.
गोल आणि चौकोन अशा दोन प्रकारातील भट्ट्या उपलब्ध
वाहतूक खर्च वाढल्याने माती आणताना भट्टीच्या प्रत्येक आकाराच्या दरात हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत वाढ होत आहे. मागणी वाढली असली तरी दरात वाढ होत आहे.
प्रेमलाल झुराये, विक्रेता