

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका, खासगी आणि अनुदानित शाळांना सोमवार (दि. ८) पासून पाठ्यपुस्तकांच्या संचांच्या वाटपाची सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापकांनी आकुर्डी आणि पिंपरीच्या वितरण केंद्रांवर पुस्तकांचे संच घेण्यासाठी गर्दी केली होती.
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागामार्फत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या आदेशानुसार, तसेच बालभारती, पुणे यांच्याकडून प्राप्त झालेली इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठीची मोफत पाठ्यपुस्तके 8 ते 12 जून या कालावधीत वितरित करण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांना इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणासाठी आकुर्डीतील वसंतदादा पाटील मनपा शाळा व पिंपरी वाघिरेतील कर्मवीर भाऊराव पाटील मनपा शाळा ही वितरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा, शासकीय शाळा, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येईल.
शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत व शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात पाठ्यपुस्तक असावे, यासाठी शिक्षण विभागाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
तथापि, खासगी अनुदानित शाळांमधील स्वयंअर्थसहाय्यित तुकड्यांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार नाहीत, याची संबंधित शाळांनी नोंद घ्यावी. सर्व मुख्याध्यापकांनी नियोजित वेळापत्रकानुसार पाठ्यपुस्तकांचा ताबा घेऊन विद्यार्थ्यांना वेळेत वितरण करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.