दोन आठवड्यांत सुरक्षा कायदा मंजूर करण्याच्या अटीवर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने गुरुवारी रात्री संप मागे घेतला. त्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णसेवा आजपासून (दि.23) सुरळीत होणार आहे. कोलकाता येथील पीडितेला न्याय मिळावा, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत सर्वंकष आढावा घेण्यात यावा, विद्यावेतन नियमितपणे मिळावे आदी मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून मार्ड संघटनेने कामबंद आंदोलन सुरु केले होते. पुढील दोन आठवड्यांत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
ससून रुग्णालयात मार्डच्या डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. ओपीडी आणि आयपीडीमधील रुग्णांची संख्या निम्म्याने घटली. तर, दाखल करुन घेतल्या जाणा-या रुग्णांवरही परिणाम झाला. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
मार्डचे सर्व डॉक्टर आजपासून ड्युटीवर रुजू होणार आहेत. त्यामुळे एक आठवडा रखडलेले उपचार, शस्त्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होणार आहे. मार्डच्या मागण्यांबाबत अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सकारात्मकता दाखवून तत्परतेने कार्यवाही केल्याने मार्डचे सदस्य त्यांची भेट घेणार आहेत.
राज्य मार्ड संघटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बैठक पार पडली. यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन करून संप मागे घेण्यात येणार आहे. ससूनमध्ये सर्व डॉक्टर ड्यूटीवर रुजू होणार आहेत.
- डॉ. शिवाजी मुंडे, अध्यक्ष, मार्ड, पुणे