विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वडगाव शेरी मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून, ते लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पठारे इच्छुक आहेत. मात्र, महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार असल्याने पठारे यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच राष्ट्रवादी पवार पक्षात फिल्डिंग लावली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याची चर्चा होती. मात्र, मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा ठोकल्यानंतर पठारे यांनी आहिस्ता कदमची भूमिका घेतली.
मात्र, काही दिवसांपूर्वीच पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पठारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला. त्यानुसार आता पठारे यांचा पक्षप्रवेश आणि उमेदवारी निश्चित झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच ते तुतारी हातात घेतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, गत विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचार यात्रा अर्धवट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांच्या पवार गटातील प्रवेशामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसणार आहे. याबाबत पठारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी बुधवारी वडगाव शेरी मतदारसंघात पदाधिकार्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीलाही पठारे यांनी दांडी मारली. त्यावर मुंडे यांनी काही अडचणींमुळे काही पदाधिकारी आले नाहीत, ते पुढील बैठकीला येतील, असे सांगितले.