पुणे : ओझोन वायुप्रदूषणामुळे भारतात गेल्या 23 वर्षांत सुमारे दोन लाख 40 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील पहिल्या पंधरा हवा प्रदूषित शहरांत भारतातील चक्क दहा शहरांचा क्रमांक लागतो, असा अहवाल विश्व आर्थिक मंच (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) ने प्रसिद्ध केला आहे. वायुप्रदूषणामुळे भारतात ओझोन प्रदूषण वाढत असल्याचा निष्कर्ष यात तज्ज्ञांनी काढला आहे.
16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. ओझोनच्या जोखमीला तोंड देण्यासाठी भारत एकटा नसून जगातील अनेक देश खराब हवा गुणवत्ता या गटात गेल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. उष्णतेच्या लाटांचा प्रसार हा विशेषतः दक्षिण आशियासाठी गंभीर धोका आहे. जगभरातील पहिल्या 15 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 10 शहरे भारतातील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) हवेच्या गुणवत्तेची मार्गदर्शक तत्त्वे 10 पटींनी ओलांडली आहेत.
उच्च पृष्ठभागावरील ओझोनचा पिकांच्या आरोग्यावरही हानिकारक प्रभाव पडतो, ज्यामुळे भारताच्या अन्न सुरक्षेला धोका निर्माण होतो. ओझोन भारतामध्ये पिकवल्या जाणार्या सर्व प्रमुख पिकांच्या जातींमध्ये पीक उत्पादन आणि बियाण्याची गुणवत्ता कमी करत असल्याचे दिसून आले आहे. गहू व तांदूळ ओझोनसाठी विशेषतः संवेदनशील झाले आहेत.
ओझोन हा तीन ऑक्सिजन अणूंनी बनलेला आहे. हा पृथ्वीच्या वरच्या वातावरणात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी आढळतो. हवेच्या वरच्या भागात एक थर आहे, जो सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करतो. सूर्यप्रकाशाद्वारे सक्रिय झालेल्या वायूंच्या प्रक्रियेद्वारे पृष्ठभाग ओझोन तयार होतो.