सोने, चांदी, कागदपत्र, चलन सुरक्षित राहावे, यासाठी बँकेकडून ग्राहकांना लॉकर सुविधा पुरविण्यात येत असते. सणासाठी लॉकरमध्ये ठेवलेली भांडी घेण्यासाठी गेले असता, काळी भांडी मिळाल्याचा प्रकार कर्वेनगरमधील नामांकित बँकेत घडला आहे. बँकेच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ग्राहक मुकुंद कुलकर्णी म्हणाले की, कर्वेनगरमधील एस.बी.आय. बँकेत माझे आणि पत्नीचे खाते असून, बँकेची लॉकर सुविधा घेतली आहे. बाप्पाचा सण जवळ आल्यामुळे काल बँकेत लॉकरमधील चांदीचे दागिने काढण्यासाठी गेलो होतो. दागिने मिळाले. परंतु सगळी भांडी काळी पडली होती, याबाबत बँकेत विचारणा केली असता लॉकर विभागात पावसाचे पाणी शिरल्यामुळे भांडी खराब झाली असावीत, असे उत्तर देण्यात आले.
दैनंदिन जीवनामध्ये विमा उतरविणे आहे का ? कर्जाची आवश्यकता आहे का ? गाडीसाठी कर्ज पाहिजे का ? अशा विविध कामांसाठी बँकेतून फोन येत असतात. पण बँकेत पाणी शिरले आहे, लॉकरवर नाव आहे. त्यामुळे बँकेतून फोन करून संबंधित ग्राहकाला याबाबत कळविणे, ही नैतिकता पाळणे आवश्यक होते. जेणेकरून ग्राहकांनी लॉकरमध्ये ठेवलेली वस्तू काढली असती व सुरक्षित राहिली असती, असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. याबाबत बँकेच्या मुख्य प्रबंधक नीतू गेहदू यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.
मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. लॉकरच्या खोलीला असलेल्या एक्झॉस्ट पंखाच्या जागेतून पाणी आत शिरले होते. खालून पहिल्या रांगेतील लॉकरपर्यंत पाणी आले होते. पाणी त्वरित काढण्यात आले व पाणी जिथून शिरले ती जागा पूर्ण बंद करण्यात आली आहे. तसेच जसे ग्राहक लॉकरमधील वस्तूची मागणी करत आहे तशी वस्तू परत करण्यात येत आहे. बाकी व्यवहार सुरळीत सुरू आहे, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकार्याने दिली.