

पुणे: भारतीय रेल्वेच्या पुणे विभागातील लोणंद स्थानकावर आरपीएफच्या ऑनड्युटी कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाला स्थानकावरून हाकलल्याने त्याच्यासह आणखी दोघांनी हा हल्ला केला. यात कॉन्स्टेबलचे डोके फुटले. दरम्यान, आरपीएफ व जीआरपीच्या संयुक्त पथकाने आरोपी संजय राजू पवार याला अटक केली असून, उर्वरित दोन फरारी आरोपींचा शोध घेतला जात आहे.
आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता लोणंद रेल्वेस्थानकावर ही घटना घडली. रेल्वे सुरक्षा बलाचे कॉन्स्टेबल जयप्रकाश ड्युटीवर होते. या स्थानकाच्या तिकीट काउंटरजवळ त्यांनी संजय पवार याला मद्यधुंद अवस्थेत झोपलेला पाहिले. त्यांनी त्याला घरी जाऊन विश्रांती घ्या, असे सांगितले. त्यामुळे त्याने संतापून शिव्या आणि धमकी दिली.
त्यानंतर तो तेथून निघून गेला. काही वेळातच तो त्याच्या भाऊ व आईसोबत परत आला. त्याच्या आईने हार्ड प्लास्टिकचा पाइप कॉन्स्टेबल जयप्रकाश यांच्या पायावर मारला. भावाने लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यांच्या उजव्या हातावरही मार बसला. त्यानंतर तिघांनी मिळून जयप्रकाश यांना मारहाण केली.
जयप्रकाश यांना रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच पुणे विभागाच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा आणि रेल्वे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमी कॉन्स्टेबलची विचारपूस केली. तपास पोलिस निरीक्षक एस. एस. काले करत आहेत.