जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी तरुणाला सामाजिक माध्यमातून तरुणी असल्याचे भासवून चॅटिंग करून त्याला भेटण्यास बोलावून त्याच्यावर खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळील सीडब्ल्यूपीआरएस कॉलनी गेटसमोर बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडला.
हल्ल्यात सागर चव्हाण (कोथरूड) हा अत्यंत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरून आलेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. हल्लेखोर दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एक महिन्यापूर्वी सोशल मीडियावर मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून जखमी तरुणाला रिक्वेस्ट पाठवली. महिनाभर चॅटिंग केले. मंगळवारी (दि. 3) रात्री बोलणे झाले आणि बुधवारी (दि. 4) सकाळी खडकवासला परिसरात भेटायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सागर चव्हाण आपल्या एका मित्राला सोबत घेऊन सकाळी लवकर किरकटवाडी फाट्याजवळ येऊन थांबला. तू कधी येतेय, आम्ही पोहचलोय, असा मेसेज करून त्याने करंट लोकेशन पाठवले आणि तिथेच त्यांनी त्याला घेरले.
सागर चव्हाण आणि त्याचा मित्र दुचाकीवर थांबलेले असताना अचानक दुसर्या दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून अज्ञात हल्लेखोर आले. एकाने दुचाकीला लाथ मारल्याने सागर चव्हाण खाली पडल्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार सुरू केले. सागरने हात मध्ये आणल्याने हाताला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरोपी दुचाकी घटनास्थळी सोडून किरकटवाडी गावच्या दिशेने फरार झाले. दरम्यान, हल्ला करणार्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास हवेली पोलिस करत आहेत.
मुलीच्या नावे चॅटींग करून कोयत्याने हल्ला करणार्या एकाला दरोडा व वाहनचोरी पथक 1 ने अटक केली. यावेळी त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले. हर्षद संदीप वांजळे (वय 18, रा. औदुंबर कॉलनी, वारजे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, हवालदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, रविंद्र लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.