छोट्याशा खोलीसाठी ‘सख्खा भाऊच पैक्का वैरी’ झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भावानेच बहिणीचा खून करून तिच्या मृतदेहाचे कसायाप्रमाणे तुकडे केले अन् नंतर नदीपात्रात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निर्घृण खून करणार्या भावाला आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या खुनाचा छडा लावण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे.
सकिना अब्दुल खान (वय 41, रा. नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाऊ अश्पाक अब्दुल खान (वय 51) व त्याची पत्नी हमीदा खान (वय 45) यांना अटक केली आहे.
मागील आठवड्यात खराडीतील मुळा-मुठा नदीपात्रात दोन्ही हात-पाय तसेच मुंडके नसलेले महिलेचे धड आढळून आले होते. राज्यातील महिला अत्याचारांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना निर्घृण खून करून मृतदेह नदीपात्रात टाकल्याने खळबळ उडाली होती. शहर पोलिसांनी गांर्भियाने तपास सुरू केला होता. स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेची दहा पथके या प्रकरणाचा तपास करत होते. ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी शहरातील 32 पोलिस ठाण्यात दाखल मिसिंग तसेच अपहरण झालेल्या महिला व तरुणींची माहिती गोळा केली. तर, मिळालेल्या मृतदेहावरील व—ण पाहून माहिती देण्याचे आवाहन केले होते. घटनास्थळ ते नदीपात्राच्या उलट्यादिशेने शोध घेत पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. त्यासाठी ड्रोनचही मदत घेण्यात आली होती. याबाबत माहिती देणार्याला दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
त्याचवेळी मृत महिलेसंदर्भात शिवाजीनगर पोलिसांकडे मावशी बेपत्ता असल्याची तक्रारी आली होती. तिच्यात आणि मामामध्ये संपत्तीवरून वाद होते, असे सांगत संशय तक्रारीत व्यक्त केला होता. लागलीच दोन वेगवेगळ्या पथकांनी आरोपी अश्पाक आणि त्याची पत्नी हमिदा यांना ताब्यात घेतले. एकीकडे अश्पाककडे चौकशी करूनही तो काहीही सांगत नव्हता. मात्र, दुसरीकडे पोलिसांनी हमिदा हिला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर 23 तारखेला झालेला सर्व प्रकार सांगितला. घटनेच्या दिवशी भैयावाडी येथील खोलीमध्ये सकिना आणि आरोपी यांच्यात खोलीवरून वाद झाला. रागाच्या भरात अश्पाक याने सकिनाचा गळा आवळून खून केल्याचे हमिदा हिने सांगितले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव, पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे निरीक्षक अनिल माने, गुन्हे शाखेच्या युनिट 4 चे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, सिद्धनाथ खांडेकर, उपनिरीक्षक राहुल कोळपे, उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक पोलिस फौजदार प्रवीण राजपूत, अंमलदार हरीश, एकनाथ जोशी, प्रवीण भालचिम, विनाद महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.