अनेक कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत, नवीन कंपन्या महाराष्ट्रात येत नाहीत. खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे काम केले, अशी टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्यानंतर काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत धंगेकर बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अजित दरेकर, सुजाता शेट्टी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. धंगेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपकडून मोठी मोठी आश्वासने दिली. बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. नवीन कंपन्या आल्या नाहीत. उलट आहेत त्याच कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या. अनेक आयटी कंपन्या खराब रस्त्याचे कारण सांगून पुण्याबाहेर गेल्या. रस्ते सुधारणारा स्मार्ट सिटी प्रकल्पच सरकारने बंद केला. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे. कोयता गँगमुळे पुणे शहर असुरक्षित झाले आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम हे सरकार करत आहे. या सरकारला गुन्हेगारांवर वचक ठेवता आला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौर्यावर येणार असल्यामुळे महापालिका प्रशासन कामाला लागले होते. शहरात सलग मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे मैदान कोरडे करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडे होती. यासाठी महापालिकेने मैदानावर मोठा मुरूम आणि खडी टाकली. असे असताना पावसाने काही उसंत घेतली नाही. मैदान कोरडे करण्याचे महापालिका 100 कर्मचारी 48 तास काम करत होते. पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या नेतृत्वाखाली 10 अभियंते याठिकाणी रात्रंदिवस काम करत होते. मैदान कोरडे करण्याचे अथक प्रयत्न प्रशासनाने केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झालेला असला तरी मेट्रो प्रशासनाने नियोजित जिल्हा न्यायालय ते स्वारगेट ही मेट्रोसेवा त्वरीत सुरू करावी, अन्यथा आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या मेट्रो सेवेचे उद्घाटन करू, असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. तसेच प्रशासनाने उद्घाटन करण्यास मज्जाव केल्यास मेट्रोच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू, असाही इशारा दिला आहे.
शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्गिका अनेक दिवसांपासून लोकार्पणासाठी तयार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी ही मेट्रो मार्गिका तयार असूनही जनतेसाठी खुली करण्यात आलेली नाही. पावसाचे कारण देऊन पंतप्रधानांनी लोकार्पण सोहळा पुढे ढकलला. जनतेच्या पैशांतून निर्माण झालेली मेट्रो मार्गिका कोणा एका व्यक्तीच्या हट्टापायी वापराविना पडून राहणे योग्य नाही.
ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते सकाळी 11 वाजता आम्ही उद्घाटन करणार आहोत. उद्घाटनानंतर मेट्रो सुरू केली नाही किंवा प्रशासनाने उद्घाटनास मज्जाव केल्यास मेट्रोच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस