राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अर्थात एनएमसीने 2023-24 पासून सर्व एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी कुटुंब दत्तक कार्यक्रम लागू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आता प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासाच्या काळात कुटुंब दत्तक घ्यावे लागेल आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. याची सुरुवात विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच वर्षापासून करावी लागणार आहे.
या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना आयोगाच्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा व्ही. वणीकर म्हणाल्या, वर्गात शिकवण्यासोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या पहिल्या वर्षापासून लोकांची आरोग्य तपासणी करण्याची संधी देण्यात आली आहे. ‘एमबीबीएस’ला प्रवेश घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासाच्या पहिल्या वर्षापासूनच कुटुंबाची काळजी घेणे सुरू करावे लागेल. कम्युनिटी आउटरीच कार्यक्रमांतर्गत किती कुटुंबांना मदत झाली, हे देखील पाहिले जाईल. याशिवाय महाविद्यालयांना ग्रामीण भागात वैद्यकीय शिबिरे व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावी लागतील.
दरम्यान, 11 जून ते 7 ऑगस्ट 2024 या काळात आयोगाकडून देशातील 28 राज्यांतील विविध जिल्हे आणि शहरांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये देशातील 496 वैद्यकीय महाविद्यालयांतील 85 टक्के एमबीबीएस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या तपासणीच्या आधारे आयोगाने पहिला सर्वेक्षण अहवाल 2024 जाहीर केला आहे. मोठ्या संख्येने लोकांना बीपी, शुगर, अॅनिमिया इत्यादी आजारांबद्दल माहिती नसल्याचे वास्तव यातून समोर आले आहे.
विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासातील आकडेवारीनुसार, 40 हजार 829 मुलांपैकी 31 टक्के मुलांना अॅनिमिया असल्याचे समोर आले आहे. याशिवाय 38 टक्के महिलांमध्ये ही समस्या आढळून येते, तर 39 टक्के गर्भवती महिलांमध्ये आणि 19 टक्के पुरुषांमध्ये अॅनिमिया आढळून आला. शिबिरात 2 लाख 73 हजार 656 कुटुंबांतील 12 लाख 9 हजार 338 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी बीपीची समस्या 17 टक्के लोकांमध्ये आणि साखरेची समस्या 14 टक्के लोकांमध्ये आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.