

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : एकलहरे (ता. आंबेगाव) येथे हॉटेल रविकिरणसमोर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या विहिरीत दोन कासवे असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. ही विहीर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे हस्तांतरित असून, या विहिरीतील कासवे बाहेर न काढता ती बुजविण्याचा प्रयत्न ठेकेदाराने केला आहे. यामध्ये ही कासवे मयत झाली असतील, तर संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करू, असा इशारा वन विभागाने दिला आहे.
एकलहरे येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या डाव्या बाजूस 50 वर्षांपूर्वीची खासगी मालकीची विहीर आहे. ही विहीर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे हस्तांतरित झाली आहे. सोमवारी (दि. 22) महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार सेवारस्ता तयार करण्यासाठी आणि विहीर बुजविण्यासाठी आले होते. त्या वेळी तेथील शेतकरी निसार शेख यांनी या विहिरीमध्ये एक मोठे व एक छोटे कासव असल्याची माहिती अधिकार्यांना दिली.
असे असतानाही अधिकार्यांनी कोणताही विचार न करता जेसीबीच्या चालकाला विहिरीचे कठडे तोडून विहीर बुजविण्यासाठी सांगितले. याबाबत प्राणिमित्र आयुब शेख यांना माहिती समजल्यानंतर त्यांनी तत्काळ वन विभागास माहिती दिली. मंचर वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक आर. आर. मोमीन यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. त्यांनी विहीर बुजविण्याचे काम स्थगित करण्यास सांगितले. त्यानंतर मात्र विहिरीत कासवे दिसली नाहीत.
मात्र, स्थानिक शेतकरी दिनकर तळेकर यांनी विहिरीत कासव असल्याचे पाहिले होते. याबाबत वन विभागाने संबंधित ठेकेदाराला विहिरीतील पाणी उपसून कासवे जिवंत आहेत की नाही, याची खात्री करावी, कासवे जिवंत असतील तर वन विभागाच्या ताब्यात द्यावीत, अशा सूचना दिल्या. तसेच कासवे मृत पावले असतील, तर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार महामार्ग रस्ते विभागाचे ठेकेदार, अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होईल, असे वन विभागाने सांगितले.