

पुणे: तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणात दोन अहवाल प्राप्त झाले आहेत. आज मंगळवारी (दि. 15) ससून रुग्णालयाच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होणार आहे. सायंकाळी पाच वाजता हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तथ्य तपासून दोषींवर कारवाई केली जाणार आहे. पुन्हा भिसे प्रकरण होणार नाही, याची काळजी घेऊ, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी चाकणकर आल्या होत्या. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चाकणकर म्हणाल्या, पहिल्या दिवसापासून या प्रकरणाचा आमच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. जे या प्रकरणांमध्ये दोषी असतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाणार आहे. भविष्यात तनिषा भिसे प्रकरण घडू नये, ही जबाबदारी आमची आहे व ती आम्ही घेतली आहे. ससून रुग्णालयाच्या उच्च समितीचा अहवाल आलेला नाही. तो आल्यावर कारवाई केली जाईल, असे चाकणकर म्हणाल्या.
महायुतीत नाराजी नाही
रूपाली चाकणकर म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची चर्चा चुकीची आहे. महायुती सरकार चांगल्या पद्धतीने एकत्र काम करीत असल्याचे विरोधकांना ते बघवत नाही. राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चांगले काम करत असून, अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे चाकणकर म्हणाल्या.
‘फुले’ चित्रपटाला पाठिंबा
‘फुले’ चित्रपटाबद्दल चाकणकर म्हणाल्या की, फुले यांच्या जीवनावर आधारित जेवढे चित्रपट प्रदर्शित झाले त्यात सेन्सॉर बोर्डाने काटछाट केलेली नाही. हिंदीमध्ये येणार्या महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटात देखील कोणतीही काटछाट न करता हा चित्रपट आहे तसाच प्रदर्शित करण्यात यावा, अशी आमची मागणी असल्याचे चाकणकर म्हणाल्या.