वेल्हे : पुढारी वृत्तसेवा
पानशेत व तोरणा वेल्हे भाग जवळच्या अंतराने जोडणाऱ्या पानशेत-वेल्हे रस्त्यावर कादवे (ता.राजगड) खिंडीत आज (मंगळवार) (दि. १३) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. त्यामुळे वेल्हे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक दुपारपर्यंत बंद पडली होती. त्यावेळी खिंडीतुन कादवे गावातील समीर जाधव (वय ३०) मोटरसायकलवरुन कादवे गावात चालला होता. तो पुढे निघून गेल्याने नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. समीर याच्या पाठोपाठ दुध वाहतूक करणारा टेम्पोही थोडक्यात वाचला.
डोंगराची दरड टप्प्याटप्प्याने रस्त्यावर येत होती. त्यामुळे सुदैवाने जिवितहानी टळली. १० ते १५ मिनिटांत डोंगराचा मोठा भाग कोसळून रस्त्यावरील वाहतूक पूर्ण बंद झाली. घाट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तोडलेल्या डोंगरांच्या कड्याची मोठी दरड उन्मळून कादवे-विहीर खिंडीत कोसळली. त्यामुळे या ठिकाणच्या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.
सध्या पाऊस नाही; मात्र गेल्या महिनाभर पडलेल्या अतिवृष्टीमुळे डोंगराच्या उन्मळलेल्या दरडी ठिसुळ झाल्याने कोसळत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रकाश गाडे यांनी सांगितले. कादवेचे ग्रामपंचायत सदस्य मोहिल तेलावडे, विनोद बिरामणे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
बांधकाम विभागाचे शाखा अभियंता साईप्रसाद मुनगिलवार, शाखा अभियंता प्रकाश गाडे यांच्या देखरेखीखाली जेसीबी मशीनने दरड काढण्याचे काम सकाळी सुरू करण्यात आले. जवळपास चार ते पाच तास दरड हटविण्याचे काम सुरू होते.
खिंडीतील तीव्र उताराच्या वळणावर तोडलेल्या डोंगरांची मोठी दरड, मोठ मोठे दगड-धोंडे, मुरुम-मातीसह कोसळल्याने मलबा काढण्यात अडथळे येत होते. अखेर दुपारनंतर दरड काढून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
कादवे खिंड, पाबे खिंड तसेच पानशेत धरण खोऱ्यातील रस्त्यावर पावसाळ्यात पुन्हा दरडी कोसळत आहेत. त्यामुळे दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे.
- अमोल पडवळ,
सरपंच, शिरकोली (ता. राजगड)
कादवे खिंडीत अनेक वर्षांपासून दरडीची समस्या आहे. उन्मळलेल्या दरडी काढुन दरड प्रणव क्षेत्र संरक्षित करण्यात यावे.
- नानासाहेब राऊत,
तालुकाध्यक्ष, राजगड काँग्रेस