कुलस्वामी खंडेराया गावकऱ्यांमध्ये वादावादी जोरदार वादावादी

पोलिसांना मध्यस्थी करत सर्वाना शांत करावे लागले.
Narayangaon News
कुलस्वामी खंडेराया गावकऱ्यांमध्ये वादावादी जोरदार वादावादीFile Photo
Published on
Updated on

नारायणगाव: कुलस्वामी खंडेराय देवस्थानच्या घटनेमध्ये बदल करून सभासदांची वाढ करावी या मागणीसाठी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये जोरदार वादावादी झाली. अनेकदा पोलिसांना मध्यस्थी करत सर्वाना शांत करावे लागले.

कुलस्वामी खंडेराय देवस्थानच्या सभासदांमध्ये वाढ करण्यात यावी व 18 वयाच्या पुढील व्यक्तींना या ट्रस्टचे सभासद करण्यात यावे या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी वडज या ठिकाणी सोमवारी (दि. 14) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत वडज व कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट या दोघांनी संयुक्तिक बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीला देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विवेक चव्हाण, माजी अध्यक्ष विजय चव्हाण, बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण, सरपंच सुनील चव्हाण, जुन्नर पंचायत समितीच्या माजी सदस्य हिराताई चव्हाण, अजित चव्हाण, दत्ता चव्हाण तसेच कुलस्वामी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष खंडू चव्हाण, सहकार मंडळाचे अध्यक्ष तानाजी चव्हाण, कुलस्वामी संस्थेची संचालक सुनील चव्हाण, संजय चव्हाण, माजी उपसरपंच संगीताताई जाधव, कमलताई चव्हाण, संध्याताई साळुंखे, हितेश चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, शंकर साळुंखे, पंकज चव्हाण, दीपक शिंदे, राजेंद्र चव्हाण, सुभाष चव्हाण, शिवाजी शिंदे ग्रामपंचायत सदस्य आणि वडज गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीला महिला देखील आवर्जून उपस्थित होत्या. बैठकीला सुरुवात करण्यापूर्वी बैठकीत होणाऱ्या चर्चेचे चित्रीकरण करून समाज माध्यमांवर प्रसारित होऊ नये अशी काही नागरिकांनी मागणी केली. तथापि देवस्थान ट्रस्टचा जर कारभार चांगला व पारदर्शक आहे तर समाज माध्यमांवर आहे ती वस्तुस्थिती जायला काय हरकत आहे? असा मुद्दा मांडत बैठकीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास अनुमती देण्यात आली.

वडज गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी आयोजित केलेल्या बैठकीचे नेमके कारण काय हे विशद केले. कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विवेक चव्हाण यांनी बैठकीला मार्गदर्शन करताना प्रत्येक कार्यकारी मंडळ सर्वांना सभासद करून घेण्यास अनुकूल असल्याचे सुरुवातीला जाहीर केल्याने उपस्थितांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.

कुलस्वामी देवस्थान ट्रस्टचे सभासद नेमके 25 की 27? असा प्रश्न उपस्थित करीत संतोष चव्हाण म्हणाले की,कुलस्वामी देवस्थान ट्रस्टने वडज गावातील अठरा वर्षे वयाच्या पुढील सर्व व्यक्तींना सभासद करून घेण्यात यावे. कुलस्वामी ट्रस्टचे अध्यक्ष विवेक चव्हाण यांनी देखील गावातील सर्व हिंदू नागरिकांना सभासद करून घेण्यास काहीच हरकत नाही असे म्हणत आपली सहमती दर्शविली. आपण सगळ्यांना सभासद करून घेऊ व धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीला पाठवून देऊ असे त्यांनी सांगितले.

अगोदर ट्रस्टची घटना बदलावी लागेल आणि मग सभासद करावे लागेल अशी भूमिका ट्रस्टचे माजी अध्यक्ष विजय चव्हाण यांनी मांडली. त्यावर संतोष चव्हाण म्हणाले की जर सभासद वाढवण्याची अनुमती नव्हती तर तुम्ही तुमच्या काळामध्ये दोन सभासद कसे वाढवले? यावर विजय चव्हाण यांना काही उत्तर देता आले नाही. ती आमची चूक झाली असे त्यांनी यावेळी कबूल केले. दरम्यान सभासद करताना सभासद फी किती ठेवावी?याबाबत वेगवेगळी मत-मतांतरे पाहायला मिळाली.

संतोषशेठ चव्हाण म्हणाले की, गावातील गोरगरीब व्यक्तींना देवस्थान ट्रस्टचे सभासद करण्यात यावे. तसेच सभासद फी मापक ठेवण्यात यावी. पाचशे रुपये फी घेऊन सर्वांना सभासद करावे असे त्यांनी सांगितले. मात्र सभासद फी 11000 रुपये ठेवावी असे यावेळी काही युवकांनी सांगितले. त्यास कडाडून विरोध करताना शाब्दिक बाचाबाची मोठ्या प्रमाणात झाली. व काही काळ बैठकीत तणाव निर्माण झाला होता.

यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना चित्रीकरण बंद करण्यास सांगण्यात आले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले. कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट सभासद व्हायचं असेल तर गावातील इतरही दोन ट्रस्टअसे एकूण तीनही ट्रस्टचे एकत्रित सभासद करण्यात यावे अशीही चर्चा पुढे आली. तिन्ही ट्रस्टच्या एकत्रित सभासद फी 9 हजार रुपये घ्यावी असाही सूर काही लोकांनी मांडला.

अगोदर गावच्या यात्रेची वर्गणी भरा आणि मग पुढच्या विषयावर बोला. जी मंडळी गावची वर्गणी भरीत नाही तीच मंडळी इथे गदारोळ करीत आहेत, असाही वाद या ठिकाणी पाहायला मिळाला. अखेर संतोष चव्हाण व विवेक चव्हाण यांच्यात चर्चा होऊन कुलस्वामी देवस्थान ट्रस्टचे सभासद होण्यासाठी 3000 रुपयाची फी ठेवण्यात यावी यावर एकमत झाले. परंतु याबाबत उपस्थिती काही नागरिकांनी कडाडून विरोध केला कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट सभासद व्हायचं असेल तर 11000 रुपये फी ठेवण्यात यावी असे सुचवले.

तसेच काही महिलांनी देखील याला दुजोरा दिला. मात्र इतर काही महिलांनी याला कडाडून विरोध केला. आम्ही मोलमजुरी करतो एवढे पैसे आणायचे कुठून? दोनशे रुपये फी भरून सर्वांना सभासद करावे अशी मागणी या महिलांनी केली. त्यामुळे कुलस्वामी खंडेराया देवस्थान ट्रस्टचे सभासद होण्यासाठी नेमकी किती फी आकारली जाणार? याबाबत शेवटपर्यंत एकमत न होता सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.

बैठकीतील ठळक मुद्दे सभेचे चित्रीकरण करून माध्यमांवर टाकू नये अशी अनेक नागरिकांची मागणी. जुन्या विश्वस्तांनी अठरा वर्ष काम केले आता तुम्ही राजीनामा द्या असाही बैठकीत सूर. दोन्ही गटाकडून आपापले मुद्दे मांडण्यासाठी जोरदार रस्सीखेच. दोन्ही गटाकडून समर्थक महिलांची उपस्थिती. आपलेच म्हणणे कसे योग्य हे पटवण्याचा दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न.

दरम्यान बैठक समाप्त झाल्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष विवेक चव्हाण यांना नेमकं बैठकीत काय ठरलं? किती रुपये फी घेऊन तुम्ही कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट सभासद करणार ? असे विचारणा केली असता ते म्हणाले की, बैठकीत फी वरून अनेकांची वेगवेगळी मते आल्याने आम्ही विश्वस्त लवकरच बैठक घेऊन सभासद फी रक्कम ठरवून या बैठकीत ठरल्याप्रमाणे वडज गावात रहिवासी असलेल्या नागरिकांना सभासद करून घेण्यात येईल.

दरम्यान या संदर्भामध्ये संतोषशेठ चव्हाण यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, गोरगरीब ग्रामस्थांना कुलस्वामी देवस्थान ट्रस्टचे सभासद होता यावे म्हणून अत्यल्प सभासद फी ठेवण्यात यावी, आमची अशी भूमिका होती व आहे.

सभेच्या अखेरीस सभासद फी तीन हजार रुपये ठेवण्यात येईल असे ट्रस्टचे अध्यक्ष विवेक चव्हाण यांनी सांगितले आहे त्यामुळे तो विषय आता आमच्या दृष्टीने संपलेला आहे तथापि ट्रस्टच्या कार्यकारिणीने यात काही फेरबदल केल्यास व तो आम्हाला मान्य झाल्यास त्यावरही मार्ग निघेल व गाव आणि देवस्थान ट्रस्ट यांच्यात एकोपा कायम राहील यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news