

पुणे : अल्पसंख्याक समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन बांधले जाणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळणार आहे. त्यामध्ये वसतीगृह, ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, क्रीडांगण आदीचा समावेश असणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज (दि.७) पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुस्लीम समुदायाला आम्ही वेगळी वागणूक दिलेली नाही. त्यांनी मत दिले तर त्यांना सत्तेत वाटा दिला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
याबाबत बोलताना रिजिजु म्हणाले, परदेशात जाऊन राहुल देश विरोधी शक्तींच्या मदतीने कार्यक्रम घेत आहेत आणि भारतात अल्पसंख्याक, दलित सुरक्षित नाहीत. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे, असे खोटे सांगून देशाची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातही संविधान धोक्यात आहे, असा खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मुस्लिम समाजाबाबत बोलताना रिजिजु म्हणाले, मुस्लीम समुदायाला आम्ही वेगळी वागणूक दिलेली नाही. पण त्यांनी मत दिले तर आमची सत्ता येईल, त्यानंतरच त्यांना सत्तेत वाटा दिला जाईल. मत दिले नाही तर संधी कशी मिळणार? आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपकडून महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचा जो नेरेटिव्ह सेट करण्यात आला होता. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला आहे, तो आगामी विधानसभा निवडणुकीत बसू नये, म्हणून भाजपकडून केंद्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकामुळे मुस्लिमांची जमीन काढून घेतली जाणार, मशीद पाडली जाणार, असे खोटे पसरविले जात आहे. असा कोणताही प्रकार होणार नाही. मुस्लिम समाजाची जनजागृती करण्याचे काम करत आहेत. जे संविधान हातात पकडून फिरत आहेत. त्यांनीच संविधान, लोकशाहीची हत्या केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत येण्यापासून रोखले, मंत्रिमंडळातही घेतले नव्हते, पंडित नेहरूंनी त्यांचा वारंवार अपमान केला. हेच लोक आता भाजपकडून संविधान धोक्यात आहे, असे सांगून मुस्लिमांचा वोट बँक म्हणून वापर करत आहेत. पण दरवेळी हा समाज काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही, असेही रिजिजू म्हणाले.
अल्पसंख्याक समुदायाची दिशाभूल केली जात असल्याने ती रोखण्यासाठी मी महाराष्ट्रात सर्वत्र फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक समुदायात सहा धर्म आहेत. पण काँग्रेसच्या काळात हे अल्पसंख्याक मंत्रालय केवळ मुस्लिमांचेच आहे, असे चित्र निर्माण केले होते. पण गेल्या १० वर्षात मोदी सरकारने सर्वांना समान संधी देऊन त्यांचा विकास केला आहे. वोट बँक राजकीय वापर मुस्लिमांचा केला पण आम्ही सर्वांना सोबत घेऊन जात असल्याचा दावा रिजिजू यांनी केला आहे.