टिळक रस्त्यावरून गणपती मिरवणूक निघाल्यानंतर सायंकाळपर्यंत अगदी पाच ते सहाच मंडळे पुढे गेलेली असतात. अंधार झाल्यानंतर डीजे घेऊन मंडळे अचानक जेधे चौकातून टिळक रस्त्यावर येण्यासाठी एकाचवेळी गर्दी होते. हे टाळूया, त्यासाठी लवकर सहभागी व्हा, असे पोलिसांनी आवाहन केले. तर टिळक रस्त्याकडे बंदोबस्तासाठी दुर्लक्ष करू नका, असे आवाहन गणपती मंडळांच्या पदाधिकार्यांनी पोलिसांना केले.
टिळक रस्त्यावरून गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार्या मंडळांच्या पदाधिकार्यांची पोलिस प्रशासनाकडून बुधवारी बैठक घेण्यात आली. त्या वेळी मंडळांचे पदाधिकारी आणि पोलिसांनी त्यांचे म्हणणे मांडले. अप्पर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संभाजी कदम, स्मार्तना पाटील, संदीपसिंह गिल विविध मंडळांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
प्रवीणकुमार पाटील म्हणाले, टिळक रस्त्यावरून दुपारी अतिशय कमी मंडळे जातात. आमचे आवाहन आहे की जास्तीत जास्त मंडळांनी दुपारपासूनच मार्गस्थ व्हावे. रात्री डीजे, लेझर शो अंधार पडल्यानंतर सुरू करून, मंडळे एकाचवेळी रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करतात. बंदोबस्त वाढवू, सर्व नियोजन चोख होईल; परंतु गणेश मंडळांकडून मला शब्द द्या. सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतला पाहिजे, शिस्तबद्ध मिरवणूक काढायची असेल तर बदल करावा लागेल.
हत्ती गणपती मंडळाचे श्याम मानकर म्हणाले, आम्ही मिरवणूक मार्गावर लवकर सहभागी होतो, परंतु आमच्या मागे कुणी नसते. टिळक रस्त्यावरील मिरवणूक भव्य करण्यासाठी मंडळांनी स्वतःहून लवकर सहभागी झाले पाहिजे. जेधे चौकात शिस्त लावण्याची गरज आहे. सवलत कुणालाही देऊ नका, असेही त्यांनी सांगितले.