सोमनाथ गायकवाड शनिवारी (दि. 1) नाशिकहून पुण्यात आला होता. प्रकाश कोमकर याने सोमनाथला फोन करून आंदेकर टोळीबाबत संताप व्यक्त केला. निखिल आखाडेच्या खुनाचा बदला सोमनाथच्या डोक्यात थैमान घालत होता. शिवाय त्याला देखील आंदेकर टोळीकडून आपला गेम होण्याची भीती होतीच. त्याने क्षणाचाही विलंब न करता अनिकेत दुधभातेला फोन करून वनराज यांचा काटा काढण्यास सांगितले. त्यानुसार सोमनाथच्या टोळीने वनराज यांचा रविवारी रात्री नाना पेठ परिसरात खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि. 3) सायंकाळी भारती विद्यापीठ पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव एमआयडीसी परिसरातून तेरा जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये तिघा अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते (वय 31), तुषार अंकुश कदम (वय 30), दीपक किसन तोरमकर (वय 29), आकाश बापू म्हस्के (वय 24), विवेक प्रल्हाद कदम (वय 25), उमेश नंदू किरवे (वय 26), ओम धनंजय देशखैरे (वय 20), अजिंक्य गजेंद्र सुरवसे (वय 19, रा. सर्व आंबेगाव पठार), समीर किसन काळे (वय 26, रा. येवलेवाडी), साहिल बबन केंदळे (वय 20, दत्तनगर, पुणे) यांना अटक करण्यात आली.
यातील काही आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. बुधवारी (दि. 4) आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, वनराज आंदेकर यांच्या खुनात सोमनाथ गायकवाड, प्रकाश कोमकर आणि अनिकेत दुधभाते या तिघांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोमकर कुटुंबीय यांच्यासोबतचा मालमत्तेचा वाद, तर सोमनाथ याच्यासोबत आंदेकर टोळीचे पूर्ववैमनस्य वनराज यांच्या खुनासाठी कारणीभूत ठरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. असे असले तरी सर्व शक्यता गृहीत धरून पोलिस तपास करीत आहेत.
आरोपींनी वनराज यांचा खून करण्यासाठी तीन पिस्तुलांतून गोळीबार केल्याचे पोलिसांच्या आत्ता पर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. ही पिस्तुले एक वर्षापूर्वी आरोपींनी मध्य प्रदेशातून आणली होती. त्यासाठी लागणारे पैसे सोमनाथ यानेच पुरविले होते.
प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते हे तिघे वनराज आंदेकर खून प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचे तपासात पुढे आले आहे. मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य हे खुनाचे कारण आहे. आत्तापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आली असून, तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर
सोमनाथचा फोन झाल्यानंतर अनिकेतने रविवारी सकाळी नाना पेठ परिसरात येऊन रेकी केली होती. मात्र, असे असले तरी त्यांनी खरेदी केलेल्या पिस्तुलांचा कालावधी पाहता वनराज यांच्या खुनाची पूर्वीपासूनच तयारी केल्याचे दिसून येते. दीड महिन्यापासून त्यांनी ही तयारी केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस त्याचा तपास करीत आहेत.