वाहतूक कोंडीमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेले शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली. मागील काही दिवसांपासून या मार्गिकेचे काम संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत होते. त्यावर अजित पवार यांनी अधिकार्यांसमवेत कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच अधिकार्यांना काम वेगात करण्याच्या सूचना केल्या.
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचा असणार्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. सार्वजनिक- खासगी सहभाग असलेला (पीपीपी) हा देशातला पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे. मागील काही दिवसांत गणेशखिंड, पाषाण आणि बाणेर रस्त्यासह आदी भागातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमधील धीम्या गतीने सुरू असलेल्या मेट्रो मार्गाचे काम, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचा आढावा घेतला होता. त्यावेळी पवार यांनी प्रत्यक्ष पाहणीही करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पवार यांनी गुरुवारी सकाळीच अधिकार्यांच्या समवेत पाहणी केली. या वेळी पवार यांनी वाहतूक कोंडी होणार्या सहा ठिकाणी भेटी दिल्या, प्रत्यक्ष पाहणी केली.
नेमकं कशामुळे वाहतूक कोंडी होती याची कारणे जाणून घेतली. त्यामध्ये विद्यापीठ सर्कल, राजभवन, संचेती चौकातील परिस्थिती जाणून घेतली. पीएमआरडीए, महावितरण, महापालिका अशा वेगवेगळ्या विभागांची कामे शिल्लक असल्याने संबंधित अधिकार्यांना पवार यांनी कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, वाहनधारकांसह नागरिकांना अडचणी येत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडच्या (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकार्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तरी देखील परिस्थिती तशीच राहिल्याने पवार यांनी स्वतः पाहणी करून अधिकार्यांना निर्देश दिले आहेत.