उत्पन्न वाढीसाठी चालक-वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता !

बारामती आगारप्रमुख वृषाली तांबे यांची माहिती
Incentive allowance to driver-carriers for increasing income
एस टी महामंडळ Pudhari
Published on
Updated on

प्रवाशांची वाहतूक करीत असताना प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणार्‍या चालक-वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी 10 टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता सम प्रमाणात देण्यात येणार आहे. बारामती आगाराच्या वतीने ही योजना राबवत असल्याची माहिती आगारप्रमुख वृषाली तांबे यांनी दिली. ही रक्कम कर्मचार्‍यांना त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे.

आपले उत्पन्न वाढावे म्हणून एसटी महामंडळाने विविध योजना व अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. ‘प्रवासी राजा दिन‘, ‘कामगार पालक दिन‘ असे उपक्रम राबवून प्रवासी आणि कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्ष प्रवासात प्रवाशांना अडचण आल्यास आगारप्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रत्येक बसमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. याबरोबरच तोट्यातील आगारांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त केले आहेत. इंधन बचतीसाठी चालक व यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे एसटी महामंडळाने ऑगस्ट महिन्यात 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये नफा मिळवला आहे.

उत्पन्न वाढीत सातत्य राहण्यासाठी चालक-वाहक हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून, त्यांची कामगिरी चांगली व्हावी, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी वाढीव उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना महामंडळाने सुरू केली आहे.

विशेष म्हणजे प्रवाशांची तक्रार, प्रवाशांशी केलेले गैरवर्तणूक अथवा उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गाचा वापर केल्यास संबंधित चालक-वाहक यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे योग्य कामगिरी करणार्‍या चालक-वाहकांना रोख स्वरूपात प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही योजना पुढे चालू ठेवण्याबाबतही निर्णय घेण्याची शक्यता आहे.

एसटीतील चालक-वाहक यांना चांगल्या कामगिरीबद्दल प्रोत्साहन भत्ता मिळाला, तर त्यांचा कामाचा उत्साह वाढेल. भत्त्याची ही रक्कम कर्मचार्‍यांना त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे.

वृषाली तांबे, आगारप्रमुख, बारामती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news