Along with the Kalvyachya Jaget Rasta and Jogging Park, the metro-loving synonym is understood
कालव्याच्या जागेत रस्ता आणि जॉगिंग पार्कबरोबरच मेट्रोचाही पर्याय समोर आल्याचे समजतेPudhari

कालव्याच्या जागेवर रस्त्याबरोबर मेट्रोचाही विचार

अत्यंत मोक्याच्या जागेवर बिल्डरांचा डोळा असल्याने हा प्रस्ताव महत्त्वाचा
Published on

खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत भूमिगत जलवाहिनी करण्यास मंत्रिमंडळाने परवानगी दिली असून, त्यामुळे रिकाम्या होणार्‍या कालव्याच्या जागेत रस्ता आणि जॉगिंग पार्कबरोबरच मेट्रोचाही पर्याय समोर आल्याचे समजते. या अत्यंत मोक्याच्या जागेवर बिल्डरांचा डोळा असल्याने हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे.

खडकवासला ते फुरसुंगी असा सुमारे 34 किलोमीटरचा भूमिगत बोगदा करण्यासाठीचा प्रस्ताव गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ मंत्रालयस्तरावर धूळ खात पडून होता. मात्र, रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा भूमिगत बोगदा करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे खडकवासला ते फुरसुंगीपर्यत शहराच्या मोक्याच्या जागेतून वाहणार्‍या उजवा मुठा कालव्याची जागा मोकळी होणार आहे. फुरसुंगीपर्यंत सुमारे 34 किलोमीटरच्या आसपास हा कालवा आहे. ही सुमारे दोनशे हेक्टरच्या आसपास असून, या जागेचा बाजारभावाने किमान 12 ते 15 हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. दरम्यान, या मोकळ्या होणार्‍या जागेवर रस्ता, जॉगिंग पार्क त्याचप्रमाणे मेट्रो करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता मिळण्यास मदत होणार आहेच. शिवाय या रस्त्यावर कायमच होणारी वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. स्वारगेटपासून ते खडकवासला गावापर्यंत हा रस्ता असणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील अतिवरिष्ठ अधिकार्‍यांनी ’पुढारी’शी बोलताना दिली.

जागा हडपण्याचे बड्या बिल्डरांचे मनसुबे ?

उजवा मुठा कालव्याची मोकळी होणारी जागा मेट्रो आणि बसमार्गासारख्या सार्वजनिक हितासाठी वापरण्याची शिफारस जलसंपदा विभागातील काही अधिकार्‍यांनी केली होती. मात्र, तिच्या व्यावसायिक वापराने मिळणार्‍या ’लाभा’कडे जलसंपदासह विविध विभागांतील काही वरिष्ठ बाबूंचे आणि राजकीय मंडळींचे लक्ष लागले असल्याने सर्वेक्षणाचा फार्स करून सार्वजनिक जागा बिल्डरांच्या घशात घालण्याच्या हालचाली मागील काही वर्षांत सुरू झाल्या होत्या. मात्र, रिकाम्या झालेल्या उजवा मुठा कालव्याच्या जागेवर सहा पदरी रस्ता करणे योग्य राहील, अशी शिफारस करणारा अहवाल जलसंपदा विभागाने शासनाकडे दिला होता. या कालव्यावर सहा पदरी रस्ता आणि उंचावरून मेट्रो मार्गिका करता येईल, असे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले होते. या अहवालानुसार या मोकळ्या होणा-या जागेवर रस्ताच होणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news