कोणत्याही निवडणुका आल्या की बरेच लोक आणि यंत्रणा जाणीवपूर्वक मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. तसेच एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जातो. असा आरोप करत भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. मागील वीस वर्षे आपण महाविकास आघाडीत होतो. त्यावेळेस देखील बरीच लोक मला टार्गेट करायचे. आता महायुतीत आहे तरी देखील मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. निवडणूक आली की हर्षवर्धन पाटलाला 'टार्गेट' करायचे हे जे काही षडयंत्र आहे याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. असे ही म्हणत पाटील यांनी भिगवण येथे प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्ष अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत इंदापूरच्या जागेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर नेहमीप्रमाणे उफाळून येतंय की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मागील वेळी आपण महाविकास आघाडीत होतो. त्यावेळी देखील आपण लोकसभेला प्रामाणिकपणे काम केले. झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीला ही आमचा त्यांचा एवढा संघर्ष असताना सुद्धा आम्ही त्यांचे प्रामाणिकपणे काम केले, असं असताना सुद्धा आता विधानसभेला हर्षवर्धन पाटलाला एकटं पाडायचं त्याच्या कार्यकर्त्याला अडचणीत आणायचं अशा पद्धतीने बरीच लोक आमच्या विरोधात कटकारस्थान करत आहेत,असे आता सामान्य माणस ही बोलत आहेत आणि मला ते अनुभवायला मिळतंय असेही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
मध्यंतरी मला गावागावात फिरू देणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य ही झाली होती. तशा पद्धतीची यंत्रणा वेगवेगळ्या मार्गातून आमच्या बाबतीत पुन्हा घडतेय की काय असा प्रश्न निर्माण होतोय. मी तर त्याच वेळेस एक पत्र ही दिलं होतं ट्वीटही केलं होतं पण तशा पद्धतीच्या घटना आता मला टार्गेट केलं जात असल्यामुळे पुन्हा घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही असंही पाटील यांनी म्हटले आहे.