पुणे : राज्यात शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत मान्सून जोरदार सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, मुंबई, पालघरसह १२ जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूरसह २८ जिल्ह्यांना मुसळधारेचा यलो अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले आहे. त्यामुळे शनिवार, दि. २४ ते मंगळवार, दि. २७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात मान्सून जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.