पत्रकार प्रसाद गोसावी यांची मृत्यूशी चाललेली झुंज अपयशी ठरली असली, तरी अवयवदानातून त्यांनी पाच रुग्णांना नवजीवन दिले आहे. देशाचे रक्षण करणार्या एका जवानाच्या शरीरात त्यांचे हृदय आता धडधडत आहे. पावणेदोन महिन्यापूर्वी एका गंभीर अपघातात जखमी झालेल्या गोसावी यांचे रविवारी (1 सप्टेंबर) निगडीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर गोसावी कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. अवयवदानानंतर काही तासांतच त्यांच्या हृदयाचे एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वी रोपण करण्यात आले. हृदयाबरोबरच त्यांची फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड आणि डोळे या अवयवांचेही दान करण्यात आले. त्यामुळे पाच रुग्णांना नवजीवन मिळाले.
खडकीमध्ये झालेल्या रस्ते अपघातात गोसावी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मेंदूला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांची प्रकृती सुधारत असतानाच अचानक मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपली. अखेर डॉक्टरांनी प्रसाद ब्रेनडेड झाल्याचे घोषित केले. या बातमीमुळे प्रसादच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीत डगमगून न जाता त्यांनी प्रसादचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. अवयवदानानंतर निगडीच्या स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.