जळोची : सध्या बँक खात्यातून पैसे परस्पर काढल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कारण समाजमाध्यमांवर घिबली फोटो ट्रेंड अनेकांच्या अंगलट येत आहे. छायाचित्रांचा गैरवापर होण्याची शक्यता वाढत आहे. सायबर गुन्हेगार लिंक पाठवल्यानंतर छायाचित्र अपलोड करा आणि घिबली फोटो मिळवा, असे आमिष दाखवून फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच मुली व महिलांसाठी हा प्रकार धोकादायक आहे. त्यांच्या छायाचित्रांचा गैरवापर होऊ शकतो.
चॅट जीपीटीने घिबली फोटो ट्रेंड आणला आहे. त्यामुळे सध्या इंटरनेटवर घिबली स्टाईल फोटोने धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जण आपले जुने छायाचित्र घिबली स्टाईल करून समाजमाध्यमांवर टाकत आहे. त्यामुळे घिबली छायाचित्र चर्चेचा विषय ठरत आहे. घिबली फोटो ट्रेंड सायबर गुन्हेगारीसाठी संधी ठरत असून अनेकांना जाळ्यात ओढून फसवणूक होत आहे. या चॅटजीपीटीचा गैरफायदा सायबर गुन्हेगार उचलत आहेत. घिबली छायाचित्राच्या प्रेमात अडकलेल्या अनेकांना छायाचित्र बनविण्याची ओढ आहे. मात्र, ते कसे बनवावे याची पुरेपूर माहिती नसते.
अशा वेळी सायबर गुन्हेगार फेसबुक, यूट्युब, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर बनाउट लिंक टाकतात व असा बनवा घिबली फोटो सांगतात. त्यामुळे अनेक जण अशा लिंकवर क्लिक करतात व सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकतात. लिंकमध्ये बँकेला जोडलेला भ्रमणध्वनी
क्रमांक आणि बँक खात्याची माहिती विचारण्यात येते. ही माहिती भरल्यानंतर सायबर गुन्हेगार काही वेळातच बँक खात्यातून काही रक्कम काढतात तसेच लिंकवर क्लिक केल्यानंतर भ्रमणध्वनी हॅक करतात. भ्रमणध्वनीमधील माहिती घेतात. ई-मेल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर ताबा मिळवतात.
घिबली फोटोसाठी सर्व माहिती दिली. घिबली फोटोसुद्धा आला. मात्र मूळ फोटोचा दुरुपयोग एका वधूवर विवाह संस्थेच्या संकेतस्थळावर केला, हे निदर्शनास आल्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली. त्यामुळे सावधान रहावे, असे आवाहन घिबली फोटोच्या नादात फसवणूक झालेले पालक करीत आहेत.
सायबर गुन्हा रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क रहावे. कोणत्याही आमिषाला व प्रलोभन स्कीम, फोटोला बळी पडू नये. कारण फसवणूक झाल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आपण स्वतः सावधान राहिले तर सायबर गुन्हा घडणार नाही.
वैशाली पाटील, पोलिस निरीक्षक, बारामती तालुका पोलिस ठाणे