बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यात सामुहिक अत्याचार

दारु पाजत केले शोषण तिघांना अटक, एकजण फरार
minor girls raped
अल्पवयीन मुलींवर अत्याचार file photo
Published on
Updated on

बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातून आता वेगळीच माहिती समोर आली आहे. या मुलींना दारु पाजत पुण्यातील हडपसर परिसरातील एका खोलीत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली तर एक आरोपी अद्याप फरार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड यांनी दिली.

ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) व यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दि. १४ सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या दि. १४ रोजी घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या. बसने त्या पुण्यात पोहोचल्या. जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले. मुलींपाठोपाठ तो ही बारामतीतून हडपसरला गेला.

तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. रात्री त्यांना दारु पाजून या तिघांसह अन्य एका फरार आरोपीने त्यांचे आळीपाळीने लैंगिक शोषण केले. दरम्यान यातील एका मुलीने हडपसरहून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱयांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले. दि. १६ रोजी या मुलींना पोलिसांनी बारामतीत आणले. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन केले जात असताना या दोघींनी दारु पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. त्यानुसार सुरुवातीला ज्ञानेश्वर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार बेंगारे व सोन्या आटोळे या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील चौथा आरोपी अद्याप फरार आहे.

या घटनेत दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत. एका घटनेत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह अॅट्राॅसिटी, लैंगिक शोषण तर दुसऱया घटनेत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लैंगिक शोषणाच्या या धक्कादायक घटनेतील आरोपी मोबाईल टाॅवर्सच्या इन्व्हर्टरला डिझेल भरण्याचे काम करतात. या तिघांशी या मुलींची आधीपासून अोळख होती. त्यातून ही घटना घडली. दोन्ही मुलींचे पितृछत्र हरपले असून दोघींच्या आई मोलमजुरी करून त्यांचे शिक्षण करते. विशेष म्हणजे आरोपींपैकी ज्ञानेश्वर याचा विवाह झालेला आहे.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारासंबंधी पालक, शिक्षक यांनी पुढे येवून माहिती देणे गरजेचे झाले आहे. अनेकदा या गोष्टी दडवून ठेवल्या जातात. त्यातून अशी घृणास्पद कृत्ये करणारांचे धाडस वाढत जाते. त्यामुळे अशा संवेदनशील प्रकऱणांमध्ये तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी.

डाॅ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news