बिबट्याने घरा लगतच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करून पाच गाभण शेळ्या ठार केल्या. संतवाडी (ता जुन्नर) शिवारातील शेळकेमळा येथे मंगळवारी (दि 24) पहाटे चार पूर्वी ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की संतवाडी रस्त्यालगत असलेल्या शेळकेमळा येथे श्रीकृष्ण सिताराम चौगुले यांनी त्यांच्या घरालगतच्या गोठ्यात शेळ्या बांधल्या होत्या. मंगळवारी पहाटेच्या पूर्वी बिबट्याने हल्ला करून पाच शेळ्या ठार केल्या आहेत.
दरम्यान याबाबत आळे वनपरिक्षेत्र कार्यालयास माहिती देण्यात आली. यानंतर वनपाल अनिल सोनवणे वनरक्षक कैलास भालेराव व रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी या घटनेचा पंचनामा केला. पाच पैकी चार शेळ्या गाभण होत्या यामुळे सुमारे सव्वा लाख रुपयांच्या वर नुकसान झाल्याची माहिती श्रीकृष्ण चौगुले यांनी दिली. संतवाडी परिसरात सहाच्यावर बिबट्यांचा वावर असल्याची माहिती सरपंच नवनाथ निमसे यांनी दिली. बिबट्यासह त्याचे बछडे परिसरात फिरत असल्याचेही अनेक जणांनी पाहिले आहे. या परिसरात अगोदरच निमसे मळा व संतवाडी गावठाण येथे दोन पिंजरे लावले असून घटना घडलेल्या ठिकाणी तातडीने दोन पिंजरे लावणार असल्याची माहिती वनपाल अनिल सोनवणे यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून सायंकाळनंतर बाहेर पडणे मुश्किल झाले असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
संतवाडी शिवारात बिबट्यांचा वावर आहे. काही दिवसांपूर्वी सुहास पाडेकर यांचे कुत्रे सायंकाळच्या वेळेस बिबट्याने ठार करत ओढून नेले होते. दोनच दिवसापूर्वी जितेंद्र पाडेकर यांच्याही कुत्रे दुपारनंतर ठार करत ते लगतच्या शेतात ओढून नेले होते. त्या परिसरात आलेल्या मेंढपाळाच्या मेंढ्यावरही दिवसाढवळ्या हल्ला बिबट्याने सोमवारी केला होता.