मांडवगण फराटा: मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील शेतकरी विलास माणिकराव फराटे पाटील यांनी तीन एकरात खरबुजाची लागवड केली. मात्र, सध्या खरबुजाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यामुळे लागवड आणि मशागतीसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने, फराटे पाटील हे हवालदिल झाले आहेत.
सध्या उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे खरबुजालादेखील याचा मोठा फटका बसत आहे. खरबूज, टोमॅटो, काकडीला सध्या तरी अपेक्षित बाजारभाव मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरीवर्ग वैतागला आहे.
मुंबई, उल्हासनगर, पुणे आदी भागांमध्ये खरबूज विक्रीसाठी पाठविला जात आहे. परंतु, बाजारभाव 4 ते 5 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. त्यामुळे खरबूज तोडायचा खर्चदेखील निघत नाही. महिला शेतकरी मंगला फराटे म्हणाल्या, सध्या खरबूज तोडण्यासाठी मजुराचा तुटवडा आहे. चांगला बाजारभाव मिळेल या आशेने खरबूज पिके घेतले. परंतु 4 ते 5 रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे.
खरबुजाला औषधे व पाणी वेळेवर दिले. बिबट्याची भीती असतानादेखील खरबूज चांगले आले पाहिजेत, ही जिद्द मनामध्ये होती. मात्र, आता खरबूज विक्रीसाठी आले तर बाजारभाव ढासळला. त्यामुळे खर्च निघतो की नाही याची पंचायत आहे.
रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करायचे आणि पीक काढणीला आल्यावर अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याची परिस्थिती शेतकर्यांच्या नशिबी कायमच आहे. अशीच शेतकर्यांची अवस्था झाली, तर शेतकर्यांच्या मुलांनी शेती कशी करायची ? तरुण शेतकरी संयमी नाहीत.
विलास फराटे, शेतकरी.