नानगाव: पाटस (ता. दौंड) परिसरातील श्री सिमेंट कंपनीच्या हवेत उडणार्या धूलिकणांमुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकर्यांच्या जमिनी नापीक होत आहेत. धूलिकणांचा थर साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.
याबाबत जय शिव संग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे, दौंड तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी कंपनी प्रशासन, पोलिस व संबंधित विभागाला लेखी निवेदन दिले आहे. प्रदूषणामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित विभागाने या निवेदनाची दखल न घेतल्यास 17 रोजी कंपनीच्या गेटवर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
सिमेंट कंपनीतून उडणार्या सिमेंटच्या धूलिकणामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार होत आहेत. त्याचप्रमाणे जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चार्यांवर सिमेंटच्या धूलिकणांचा थर साचल्याने जनावरे चारा खात नाहीत. कंपनी जल, वायुप्रदूषण तसेच उद्योग संचलनालय यांचे स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भातील आदेशाचे उल्लंघन करून कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पाटस हद्दीमधून रस्त्याने सिमेंटची वाहतूक करणारी वाहने ही क्षमतेपेक्षा जादा माल भरून जात असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या लेखी निवेदनाच्या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी श्री सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापकीय विभातील रवी पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नंतर संपर्क करतो असे सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांनी संपर्क साधला नाही. पुन्हा संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
संबंधित कंपनीमुळे परिसरातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. होत असलेल्या प्रदूषणाचे पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
- वसंतराव साळुंखे, उपाध्यक्ष जय शिव संग्राम.
संबंधित सिमेंट कंपनीमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. दिवसेंदिवस शेती नापीक बनत चालली आहे. त्यामुळे आम्हाला नुकसानभरपाई मिळावी. संबंधित कंपनीने या विषयाकडे गांभीर्याने पाहावे.
- शरद साळुंखे, स्थानिक शेतकरी.