सासवड: प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकल्प करण्याची प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. याबाबत प्रकल्पबाधित गावांमध्ये विरोधाचा सूर वाढत चालला आहे. पारगाव मेमाणे, वनपुरी, उदाचीवाडी या गावांमध्ये विमानतळाबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि. 14) ग्रामसभेचे आयोजन केले होते.
जमीन द्यायचीच नाही, तर मोबदला वगैरे गोष्टींवर चर्चाच कशाला करायची? यावर एकमत झाल्याने भूसंपादन अधिकार्यांच्या दौर्याकडे पारगाव मेमाणे, वनपुरी, उदाचीवाडी या ग्रामस्थांनी पाठ फिरवली.
पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन विनातक्रार पार पडावे, यासाठी भूसंपादनाचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे हे पारगाव मेमाणे, वनपुरी, उदाचीवाडी या गावांतील शेतकरी तसेच जमीनमालकांशी संवाद साधण्यासाठी सोमवारी (दि. 14) आले होते. या वेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, सहायक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे उपस्थित होते.
शेतकर्यांचा विमानतळाला तीव्र विरोध आहे. याबाबत गावात नुकतीच बैठक झाली. आमच्या जमिनी विमानतळासाठी द्यायच्या नाहीत, त्यामुळे आम्हाला अधिकार्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा करायची नाही, असा ठराव झाला आहे.
- पी. एस. मेमाणे
चर्चेसाठी शेतकर्यांसह गावांतील नागरिकांना बोलाविण्यात आले होते. मात्र, तीनही गावांत चर्चेला कोणीच आले नाही. शेतकर्यांमध्ये संभ्र मावस्था आहे. पुन्हा नागरिकांशी चर्चा करावी लागणार आहे.
- वर्षा लांडगे, उपविभागीय अधिकारी, पुरंदर
स्थानिक अधिकारी, कर्मचार्यांनी सरकारची विमानतळ करण्याची भूमिका पटवून द्यावी. पुरंदरमध्ये विमानतळ करण्यावर सरकार ठाम आहे. नागरिकांची मानसिकता बदलायला हवी. त्यामुळे स्थानिक अधिकार्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
- डॉ. कल्याण पांढरे, भूसंपादन समन्वयक