

महाळुंगे पडवळ : मुसळधार पावसाने आता शेतांत तणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी तणनाशकांचा वापर करण्यावर भर देत आहेत. मात्र बाजारात बोगस तणनाशक विकले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.(Latest Pune News)
आंबेगाव तालुक्याच्या अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे तणांची बेसुमार वाढ झाली आहे. त्यावर उपाय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात तणनाशकांचा वापर करतात. मात्र बाजारात बोगस तणनाशकाच्या पुड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. त्याची फवारणी केली तरी गाजरगवतासारखे तण जळून जात नाही. तसेच या तणनाशकामुळे जमिनीचा पोतही खराब होत आहे. असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना सहन करण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर गाजरगवतासह इतर तण वाढले आहे. या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची तणनाशके वापरतात. सध्या बाजारात विक्रीसाठी असलेले तणनाशकात अमोनियम सॉल्ट ऑफ ग्लायफोसेट नावाचा घटक जास्त प्रमाणात वापरण्यात येत असल्यानेच तण जळत नाहीत.
या पुड्यांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. जमिनी नापीक होण्यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने या तणनाशकावर कारवाई करावी. अशी मागणी आंबेगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी केली आहे. याबाबत कृषीतज्ज्ञ राजेंद्र मोढवे यांनी ग्लायफोसेट या तणनाशकावर मागील काही महिन्यात बंदी घातली होती. आता बाजारात तीन प्रकारची बोगस तणनाशके मिळत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदीची बिले घ्यावीत, असा सल्ला या वेळी मोढवे यांनी दिला.
शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या तणनाशकांच्या संशयास्पद पुड्यांबाबत खरेदीच्या बिलांसह लेखी तक्रार करावी. त्यानुसार पुड्यांवरील कंपन्यांची तपासणी केली जाईल.
सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी