विधानसभा जागांच्या बाबत तालुकास्तरावर पेच सुटलेला नाही. परंतु, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एकत्र बसून त्यातून चार गोष्टी समजून सांगून मार्ग काढण्याचे ठरले आहे. आम्ही येणार्या विधानसभा निवडणुका महायुतीतून लढणार आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगून, ‘कार्यकर्त्यांना वाटते ते बोलून दाखवतात. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. वरिष्ठ पातळीवर बसून आम्ही निर्णय घेऊ,’ असेही पवार म्हणाले.
पुण्यात आज गुरुवारी (दि.26) होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होत असलेल्या सभास्थळाची उपमुख्यमंत्री पवार यांनी बुधवारी संध्याकाळी पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
विधानसभेला महायुतीतून बाहेर पडणार का? या प्रश्नावर पवार म्हणाले, आम्ही येणार्या विधानसभा निवडणुका महायुतीतून लढणार आहोत. समोरचे महाविकास आघाडीकडून लढतील आणि आणखी एक तिसरी आघाडी झालेली आहे. चौथी आघाडीचे ही काही उमेदवार आपआपले उमेदवार उभे करणार आहेत, अशी वेगवेळ्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात यावेळी विधानसभेला बघायला मिळेल. आम्ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून लढणार आहोत. आम्ही व्यवस्थित महायुतीमधील एकमेकांचा मानसन्मान राखून जागा वाटप करू. सकारात्मक सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत. समाविष्ट गावांमधील मालमत्ता कराच्या प्रश्नावर पवार म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांबरोबर चर्चा करून पुणे महापालिकेतील समाविष्ट गावांच्या मालमत्ता कराचा प्रश्न मार्गी लावला जाईल. लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते, मात्र इतर कामांच्या व्यापामध्ये राहून गेले. परंतु आता तातडीने हा प्रश्न मार्गी लावू.
तेरा तालुक्यांसह पुणे शहरामध्ये डीपीसीचा व्यवस्थित निधी दिलेला आहे.
खासदार आणि आमदार हे डीपीसीला निमंत्रित आहेत. त्याच्यामुळे त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.
योजना मंजूर करताना आम्ही पक्ष म्हणून विचार करत नाही. राज्यसरकारचे प्रतिनिधित्व करत आहोत.