आशिष देशमुख
सौरमंडळ एका विशिष्ट दिशेने फिरत असते. त्यामुळे अवकाशाची एक बाजू लालसर (उजळ), तर दुसरी निळसर (सावळी) आहे. तसेच ब्रह्मंडाच्या महाकाय पसार्यात सर्वत्र भौतिकशास्त्राचे नियमही सारखे लागू होतात, असा निष्कर्ष काढणारे संशोधन आयुकातील शास्त्रज्ञ प्रा. डॉ. नीरज गुप्ता यांनी केले आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील मिरकॅट या दुर्बिणीच्या साहाय्याने अवकाशातील सौरमंडळाचा द्विध्रुवीय प्रभाव मोजण्यात यश मिळवले आहे.
पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रो फिजिक्स (आयुका) या संस्थेतील खगोल शास्त्रज्ञ डॉ. नीरज गुप्ता यांनी कॉस्मिक द्विध्रुवीय प्रभाव मोजण्यात यश मिळवले आहे.
सौरमंडळ हे एका विशिष्ट दिशेने फिरत असते, ज्यामुळे अवकाशाचा एक भाग हा दुसर्या भागापेक्षा अधिक उजळ दिसतो. मिरकॅट या दुर्बिणीने नोंदवलेली गेल्या 10 वर्षांतील अनेक निरीक्षणे मोजमाप चाचण्यांवर आधारित हे संशोधन विश्वाच्या संरचनेच्या मुळाशी केले गेले. त्यातून हे निष्कर्ष काढले आहेत.
मिरकॅट या दुर्बिणीच्या सर्वेक्षणाद्वारे तयार केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कॅटलॉग आहे. काही दशलक्ष किंवा त्याहून अधिक स्रोत असलेल्या रेडिओ लहरींचा समूह शोधून त्याचा वापर कॉस्मिक द्विध्रुवीय प्रभावाची चाचणी करण्यासाठी केला, ज्यामुळे आकाशाचा एका भाग दुसर्या भागापेक्षा अधिक उजळ दिसून आला. आयुकामध्ये एक अत्याधुनिक प्रक्रिया आणि डेटा स्टोअरेज सुविधा प्रयोगशाळा स्थापित करण्यात आली आहे. जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर रेडिओ स्ट्रोनॉमी येथे प्रतिमा आणि या कॅटलॉगचे अधिक काळजीपूर्वक विश्लेषण करण्यात मदत झाली, त्यातून हे निष्कर्ष मांडण्यात आले.
आकाशाच्या विस्ताराऐवजी खोलीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे या प्रतिमांमधील अनेक स्रोत प्रथमच शोधले गेले आहेत. यात द्विध्रुवीय मापन टिपता आले. मात्र, अवकाशाची खोली हे मोठे गूढच असल्याचे मत शास्त्रज्ञांनी मांडले आहे.
ब्रह्मांड कॉस्मिक ऊर्जेने भरलेले आहे. ही ऊर्जा अतिविशाल आहे. तिच्या प्रभावाखाली संपूर्ण ब्रह्मांडाची रचना कार्यरत असते. सूर्यमंडळात सूर्याभोवती फिरणारे ग्रह आणि त्यांच्या भोवती फिरणारे उपग्रह हे सर्व प्रचंड ऊर्जेमुळेच फिरत असतात, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण असे म्हणतो. हे गुरुत्वाकर्षण ब्रह्मांडात सर्वत्र एकसारखे आहे. निसर्गातील सर्व घडामोडी या वेळेनुसारच चालू असतात. नैसर्गिक नियम हे ठरलेले असतात व ते कुणीही मोडू शकत नाही. दिवस होणे, रात्र होणे, प्रकाश-अंधार, भरती-ओहोटी ही निसर्गाची कामे सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच चालू आहेत.