राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये वाटप करण्यात आलेल्या विविध निवडणूक चिन्हांमध्ये राजकीय पक्षांना दिलेल्या चिन्हांमध्ये काही ठिकाणी साधर्म्य आढळून आले. त्यामुळे अशा ठिकाणी प्राधिकरणास चिन्हाच्या नावामध्ये सुधारणा करून काही चिन्हे वगळणे आवश्यक वाटल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी तुतारी चिन्ह वगळण्याचे शुध्दिपत्रक जारी केले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 च्या नियमांतील तरतुदींनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना द्यावयाच्या निवडणूक चिन्हांबाबत विविध परिपत्रके प्राधिकरणाने यापूर्वीच जारी केली आहेत. त्यातील नियमानुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी संबंधित निशाणी, चिन्हे हे सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना देता येणार नाहीत. त्यानुसार यापूर्वी वगळण्यात आलेल्या चिन्हांचा वापर करू नये, असे प्राधिकरणाने दि. 28 नोव्हेंबर 2022 च्या आदेशित केलेले आहे. तरीसुद्धा प्राधिकरणाने दि. 10 ऑक्टोबर व 31 डिसेंबर 2014 च्या परिपत्रकाद्वारे सूचित केलेली चिन्हे व निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिलेली चिन्हे यामध्ये काही ठिकाणी साधर्म्य असल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी प्राधिकरणास चिन्हाच्या नावामध्ये सुधारणा करून काही चिन्हे वगळणे आवश्यक झाल्याने 31 डिसेंबर 2014 च्या परिपत्रकासोबतच्या चिन्हातील अनुक्रमांक 25 असलेले तुतारी चिन्ह वगळण्याचे शुध्दिपत्रक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी नुकतेच जारी केले आहे.