सध्या चिकुनगुनिया या आजारामध्ये न्यूरोलॉजिकल गुंतागुंत, अर्धांगवायू आणि त्वचेवर काळे चट्टे, अशी लक्षणे दिसून येत आहेत. रुग्णांमध्ये यापूर्वीही अशी लक्षणे आढळून आल्याचा दावा सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे. तर, चिकुनगुनियाची साथ 19 वर्षांनी आली असून, लक्षणांची तीव्रता आणि प्रमाण जास्त असल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे.
राज्यात यापूर्वी 2005 मध्ये चिकुनगुनियाची मोठ्या प्रमाणात साथ आली होती. त्या वेळी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये जास्त रुग्ण आढळले होते. त्या वेळी 0.1 टक्के रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल गुंतागुंत आढळून आली होती. त्यानंतर 19 वर्षांनी पुन्हा साथ आल्याचे यंदा न्यूरोलॉजिकल लक्षणांचे प्रमाण 10-20 टक्क्यांपर्यंत वाढल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. आरोग्य विभागाने याबाबत अभ्यास करण्यासाठी जलद कृती दलाची स्थापना केली आहे. खासगी डॉक्टरांनी चिकुनगुनियाच्या बदलत्या आणि वाढत्या लक्षणांबाबतचा प्रश्न अधोरेखित केला. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच, लक्षणांमध्ये नावीन्य नसल्याचे नमूद केले आहे. तर, दुसरीकडे आरोग्य विभागाला उशिरा जाग आल्याचा डॉक्टरांचा आरोप आहे.
विषाणुजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, सध्या आरोग्य विभागाकडून केवळ राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये (एनआयव्ही) तपासणी झालेल्या नमुन्यांचे अहवाल ग्राह्य धरले जात आहेत. रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने एकाच वेळी हजारो नमुन्यांची तपासणी एनआयव्हीमध्ये होणे शक्य नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने खासगी प्रयोगशाळांमधील अहवालही ग्राह्य धरावेत. आपल्या कार्यक्षेत्रात न्यूरोलॉजिकल लक्षणे, अर्धांगवायू आणि हायपरपिग्मेंटेशन अशी लक्षणे संशयित रुग्णामध्ये दिसून आल्यास त्याचे दोन रक्तजल नमुने घेऊन एक नमुना राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि दुसरा नमुना बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्याच्या सूचना सरकारी आणि खासगी रुग्णालयांना करण्यात आल्या आहेत, असे आवाहन शासकीय आणि खासगी रुग्णालयांना करण्यात आले आहे.
यंदाच्या चिकुनगुनियाच्या साथीमध्ये मेंदुज्वर, अर्धांगवायू, बेशुद्ध पडणे अशा लक्षणांबरोबर हात-पाय निकामी होणे, याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशी लक्षणे 60 वर्षांवरील पुरुषांमध्ये जास्त दिसत आहेत. चिकुनगुनियाची लक्षणे दिसणार्या रुग्णांमध्ये गुंतागुंत निर्माण होत असल्याने दवाखान्यांमध्ये राहण्याचा कालावधी वाढतो. उपचारांमध्ये दोन प्रकारची इंजेक्शन द्यावी लागतात. यासाठी लाखो रुपये खर्च होतो. आयसीयूचा खर्चही वाढतो आहे. आत्तापर्यंत किमान 2000 रुग्णांमध्ये ही परिस्थिती आढळून आली आहे. आरोग्य विभागाला याबाबत गांभीर्य नाही किंवा उशिराने जाग आली आहे.
डॉ. अमित द्रविड, विषाणुजन्य आजारांचे तज्ज्ञ
न्यूरोलॉजिकल गुंतागुंत, अर्धांगवायू, त्वचेवर काळे चट्टे अशी लक्षणे नव्याने दिसत असून, विषाणूच्या जनुकीय रचनेत बदलत झाल्याची पडताळणी करावी, असे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे. भूतकाळात बर्याच रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसली आहेत. चिकुनगुनियाबरोबर डेंग्यू, झिका, मेंदुज्वर आदी आजारांमध्येही लक्षणे दिसून येऊ शकतात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ती नमूद केलेली आहेत. त्यामुळे लक्षणे नव्याने दिसत असल्याच्या दाव्यामध्ये तथ्य नाही. तरीही, चिकुनगुनियाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सर्व स्तरांवर सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, जलद कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.
डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्यसेवा, पुणे विभाग
रक्तजल नमुन्याबरोबर रुग्णांचे केसपेपर संपूर्ण भरून पाठविण्यात यावेत. यामध्ये रुग्णाचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर नमूद करावा.
नमुने शीतसाखळीमधून व दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाठवावेत.
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडील लक्षणे दिसून येणार्या रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. तथापि, या तपासणीसाठी त्यांनी रुग्णाकडून कोणतीही फी वसूल करू नये.
चिकुनगुनिया आरटीपीसीआर पॉझिटिव्ह रक्ताचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी योग्य असतात. ते एनआयव्ही तसेच बी. जे. शासकीय मेडिकल कॉलेज येथे पाठवावेत.
या वर्षी चिकुनगुनिया आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जानेवारी 2024 पासून किती रुग्ण आढळून आले, याची माहिती रुग्णालयांकडून मागवून घ्यावी.
सर्व जिल्हास्तर अधिकार्यांनी तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी जनतेमध्ये घबराट निर्माण होणार नाही, यासाठी सकारात्मक माहिती प्रसिद्ध करावी.
डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या क्लिनिकल व्यवस्थापनासाठी सर्व खासगी व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण आयोजित करून मार्गदर्शन करावे.
रुग्णाच्या वास्तव्याच्या व कामाच्या ठिकाणी तसेच आजूबाजूच्या ठिकाणी प्रभावी कीटकशास्त्रीय सर्वेक्षण व उपाययोजना करून
तेथे एकही डास, अळीदूषित कंटेनर दिसून येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.