राज्यातील मागील वर्ष 2023-24 च्या ऊस गाळप हंगामाचा आढावा आणि यंदाच्या 2024-25 च्या गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक येत्या सोमवारी (दि. 23) मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात दुपारी चार वाजता बोलाविण्यात आली आहे. त्यामध्ये हंगाम कधी सुरू करायचा? याची तारीखनिश्चिती होणार असून, यंदाचा हंगाम 1 नोव्हेंबर किंवा 15 नोव्हेंबरपासून सुरू करायचा, यावर बैठकीत शिक्कामोर्तब होईल.
बैठकीस कृषिमंत्री धनंजय मुंडे व अन्य मंत्री, संबंधित विभागाचे सचिव, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदींसह साखर उद्योगाशी संबंधित मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
राज्यात गतवर्ष 2023-24 चा हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला होता, तर यंदाचा 2024-25 चा हंगाम 1 किंवा 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यावर निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या प्रतिटन दहा रुपयांप्रमाणे करण्यात येणार्या कपातीचा मुद्दा प्राधान्याने चर्चेत येईल. साखर कारखान्यांकडून या महामंडळासाठी अद्याप 158 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम दिल्याशिवाय साखर कारखान्यांना यंदाचा ऊस गाळप परवाना देण्यात येऊ नये, असा निर्णयही होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शासनाच्या व साखर उद्योगाशी निगडित महत्त्वाच्या उपक्रमांसाठी साखर कारखान्यांकडून काही रक्कम कपातीवर महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत होतात. त्यामध्ये मुख्यमंत्री साह्यता निधी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, साखर संकुल देखभाल निधीपोटी प्रतिटन ऊस गाळपावर होणार्या कपातीचा समावेश आहे.
केंद्र सरकारने हंगाम 2024-25 मध्ये गाळप होणार्या उसासाठी उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) ही 10.25 टक्के बेसिक साखर उतार्यासाठी प्रतिमेट्रिक टन 3400 रुपये निश्चित केलेली आहे. 10.25 टक्क्यांच्या पुढे 0.1 टक्का उतार्यासाठी प्रतिटन 33.20 रुपये आणि 10.25 टक्क्यांपेक्षा कमी आणि 9.50 टक्क्यांपेक्षा जास्त उतारा असेल, तर 0.1 टक्क्यासाठी 33.20 रुपये प्रतिटन असा दर आहे. तर, 9.5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी उतारा असल्यास प्रतिमेट्रिक टन 3151 रुपये दर जाहीर केलेला आहे.
कृषी विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यात प्रत्यक्ष गाळपासाठी 904 लाख टन ऊस उपलब्ध होऊन 10.23 टक्के सरासरी उतार्यानुसार राज्यात यंदा 92 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. तर, साखर आयुक्तालयाने मिटकॉन संस्थेकडून घेतलेल्या अहवालानुसार प्रत्यक्षात 1013 लाख टन ऊस गाळप होऊन 10.23 टक्के सरासरी उतार्यानुसार 104 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविलेला आहे.