राजधानी किल्ले राजगड व दुसरी राजधानी किल्ले रायगडसह राज्यातील बारा किल्ले जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी सज्ज झाले आहेत. रविवारी (दि. 26) मुसळधार पावसाची पर्वा न करता शेकडो शिवभक्तांनी रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली.
रायगडावर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांच्या हस्ते छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांना पुष्पांजली अर्पण करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. पुणेकर संस्थेच्या नेतृत्वाखाली विविध शिवप्रेमी संघटना या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. संस्थेचे अध्यक्ष पराग मते, डॉ. शीतल मालुसरे, दिनेश कदम आदी उपस्थित होते.
छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीत रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, साल्हेर आदी किल्ल्यांचे बांधकाम केले. अभेद्य व बळकट किल्ले म्हणून या किल्ल्यांचा लौकिक आहे. जागतिक पातळीवर या किल्ल्यांमुळे शिवरायांच्या प्रखर राष्ट्रभक्ती, मानवकल्याणकारी कार्याचा व शौर्याची कीर्ती पोहचणार आहे.
रायगड, राजगडसह राज्यातील बारा किल्लांची युनोस्कोकडून 1 ते 12 ऑक्टोबरपर्यंत पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी पुरातत्व खात्याच्या वतीने आवश्यक कामे सुरू आहेत. एकाच वेळी राज्यातील छत्रपती श्रीशिवरायांचे 12 किल्ले जागतिक पातळीवर जाणार आहेत. त्यासाठी राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत स्थानिक ग्रामस्थ, शिवभक्त, सेवाभावी संस्था संघटनांनी सहभागी व्हावे.
डॉ. विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व विभाग.
येत्या 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय मानांकन समिती या किल्ल्यांची पाहणी करणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. गडाच्या स्वच्छतेसह आवश्यक डागडुजी व ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत.
युनोस्कोच्या जागतिक वारसास्थळ आंतरराष्ट्रीय मानांकन समितीला महाराष्ट्रातील छत्रपती श्रीशिवरायांचे किल्ले पाहण्याची मोठी उत्सुकता लागली आहे. सप्टेंबर महिन्यात समिती किल्ल्यांची पाहणी करणार होती. मात्र, सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने समितीने 1 ऑक्टोबरपासून किल्ल्यांची पाहणी करण्याचे नियोजन केले आहे.