बदलापूरमधील दोन मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर उपनगरांसह समाविष्ट गावांमधील शाळांच्या पाहणीत बहुतांश शाळा या घटनेनंतर अलर्ट झाल्याचे दिसून आले. मात्र, काही शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा मोडकळीस आलेल्या असून मुला-मुलींच्या सुरक्षेबाबत शाळा प्रशासन पुरेसे दक्ष नसल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे. केवळ शाळांमध्येच नाही तर शाळेबाहेर येण्या-जाण्याच्या रस्त्यावरही काही ठिकाणी समाजकंटक तरुणांकडून विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापकवर्ग यांना त्रास दिला जात असल्याचेही या पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकूणच पुरेशा सीसीटीव्हींमुळे आश्वासक स्थिती असली, तरी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचीही गरज यामुळे अधोरेखित झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली असून, मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये सर्वत्र चिंतेचे तसेच भीतीचे वातावरण आहे. समाविष्ट गावांतील शाळांच्या व्यवस्थापनामध्ये कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, अन्य सर्व सोयीसुविधांप्रमाणेच शाळांमध्ये सरस्वती प्राथमिक विद्यालय, धानोरीतील कै. बाबूराव माधवराव टिंगरे प्राथमिक शाळा आदी महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. काही शाळांमध्ये पूर्वी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शाळांमध्ये शिकणार्या शेकडो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पालकवर्गामध्ये असुरक्षिततेची भावना आहे.
महापालिकेने वेळ न दवडता वरील शाळांमध्ये तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पालकवर्गातून केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी महापालिकेने या भागातील काही शाळांमध्ये आठवड्यापूर्वी सर्वेक्षण केल्याचे समजते. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नितीन वाणी म्हणाले, लवकरच 15 कॅमेरे बसविणार आहोत.