लोणी काळभोर: पुढारी वृत्तसेवा
रिंगरोड जमिनीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून दोन जणांवर एका उद्योजकाकडून गोळीबार केल्याची घटना आज (शनिवार) सकाळी घडली आहे, जखमींवर लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना कोरेगाव मुळ (ता.हवेली) येथील इमानदार वस्ती येथे घडली आहे.
हवेली तालुक्यांतील ग्रामीण पोलीस दलातील ऊरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव मुळ हद्दीतील इमानदार वस्ती येथील एका बड्या उद्योजकाच्या घरात रिंगरोडच्या जमिनीमध्ये गुंतवणूक केलेले पैसे मागण्यासाठी दोन तरुण गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यावसान गोळीबारात झाले. या वादात उद्योजकाने आपल्या पिस्तुलातून दोन राऊंड फायर केले असुन, पायावर व पाठीवर गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ऊरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन, संशयीत आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत, तर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.