नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा आज (रविवार) नारायणगावला जनसन्मान यात्रा दौरा होता. यादरम्यान जुन्नर तालुका भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवून उपमुख्यमंत्री पवार यांचा निषेध करण्यात आला.
पालकमंत्री अजित पवार नारायणगावला पर्यटनासंदर्भात बैठक घेतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम असताना प्रशासनाचा दुरुपयोग करून फक्त आपलाच पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात. आमदार अतुल बेनके देखील महायुतीच्या इतर स्थानिक नेत्यांना विश्वासात घेत नाहीत. पर्यटनासंदर्भात बैठकीचे लावलेले फ्लेक्स यावर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो नाहीत. त्यामुळे जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने त्यांचा निषेध करण्यात आला.
अजित पवारांविरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. भाजपच्या नेत्या आशाताई बुचके, भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष खैरे, जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप गांजाळे, वारूळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच राजू मेहेर, माजी उपसरपंच माया डोंगरे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या वतीने राबवली जात आहे. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे कार्यकर्ते या योजनेचे नाव बदलून स्वतःच्या पक्षाला फायदा कसा होईल, याबाबतचा देखील प्रयत्न करत असल्यामुळे आम्ही याचा निषेध करतो असे म्हणत भाजपचे नेते आशाताई बुचके यांनी निलायम मंगल कार्यालयाकडे अजित पवार जात असताना त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या सर्वांना पुढे जाण्यापासून रोखले. यावेळी भाजप नेते आशाताई बुचके व त्यांच्या समर्थकांनी त्याच जागेवर ठिय्या मांडून जोरजोरात अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.