सुहास जगताप
पालकमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना डावलत असल्याने त्यांच्या विरोधातील असंतोष उफाळून आल्याने भाजप कार्यकर्ते आता पवार यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने करू लागले आहेत. पुणे या आपल्या बालेकिल्ल्यावरील मांड ढिली होऊ नये, यासाठी पालकमंत्रिपद मिळाल्यापासून अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यास सुरुवात केल्याचा या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
महायुतीतील भाजप-शिंदे शिवसेना कार्यकर्त्यांकडे अजित पवार यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने या दोन पक्षांच्या विशेषतः भाजपच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात मोठा असंतोष खदखद असल्यामुळे अजित पवारांना जाहीरपणे विरोध करण्याची हिंमत भाजप कार्यकर्ते दाखवत आहेत. पुणे जिल्ह्यात तरी महायुतीतील एकोपा यामुळे बिघडल्याचे चित्र आहे. रविवारी जुन्नर तालुक्यात अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पोहचली, त्या वेळी तेथील स्थानिक भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांनी अतिशय आक्रमकपणे अजित पवारांच्या विरोधात मोठे आंदोलन केले.
त्यांना काळे झेंडे दाखविले, रस्त्यावर ठाण मांडले, घोषणा दिल्या. एवढ्या आक्रमकपणे भाजप कार्यकर्ते पालकमंत्र्यांना भिडल्यामुळे आणि पोलिसांनी अतिशय ढिलाईची भूमिका घेतल्याने भाजपच्या वरिष्ठांकडूनच आपल्या या कार्यकर्त्यांना ‘सिग्नल’ नसावा ना, अशीही शंका बोलून दाखवली जात आहे. यापूर्वीही शिरूर लोकसभा मतदारसंघातील पराभवाच्या विश्लेषणासाठी ज्या वेळी भाजपची बैठक झाली होती, त्या वेळीही जिल्ह्यातील भाजपच्या एका कार्यकर्त्याने ‘अजित पवारांना महायुतीच्या बाहेर काढा’ अशी मागणी त्या बैठकीत केली होती आणि त्याचा ‘व्हिडीओ’ काढून तो ‘व्हायरल’ही केला होता. त्या वेळीही भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी या प्रकाराची काहीही दखल घेतली नव्हती.
अजित पवार हे सार्वजनिक आणि खासगी कामे करण्यामध्ये भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना डावलत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस अधिकाधिक भक्कम करण्यावरच अजित पवारांचा भर आहे. आपल्याच पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांना ते मोठ्या प्रमाणावर निधी देत आहेत. तसेच त्यांच्याच कामासाठी अधिकारी आणि इतर मंडळींना फोन करतात. बाकीच्या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांना तर त्यांना भेटण्याचीही सोय राहिलेली नाही, असे आक्षेप भाजप कार्यकर्त्यांकडून घेतले जात आहेत.
राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार गेल्यानंतर भाजप आणि शिंदे शिवसेना यांचे सरकार स्थापन झाले, त्या वेळी पुण्याचे पालकमंत्रिपद भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते. त्या वेळी भाजप कार्यकर्त्यांची पुणे जिल्ह्यात चलती होती. ‘ते म्हणतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच तोरण’ अशी अवस्था होती. चंद्रकांतदादा हे भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर बळ देत होते. त्यानंतर शिंदे-भाजपच्या युतीची ‘महायुती’ झाली आणि अजित पवारांचा त्यामध्ये शिरकावा झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे गेले आणि भाजपच्या आणि शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या नशिबी वनवास आला. त्यांची काहीच कामे होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नऊ मतदारसंघांपैकी फक्त एकाच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. उर्वरित जागेवर गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची युती असताना निवडून आलेले राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे आमदार असल्याने या सर्व जागांवर अजित पवारांनी दावा ठोकलेला आहे. अशा वेळेला विधानसभेला आपल्याला काहीच मिळणार नसल्यामुळे विधानसभा लढविण्याच्या तयारीत असलेले भाजपचे तालुका पातळीवरील तगडे नेतेही कार्यकर्त्यांच्या असंतोषाला बळ देत असल्याचे चित्र समोर आले आहे.