इंदापूर तालुक्यातून वाहणार्या भीमा व निरा या दोन्ही नद्यांची पूरस्थिती मंगळवारी (दि. 27) देखील कायम होती. तालुक्यातील सर्व बंधारे सोमवारपासून पाण्याखाली आहेत. तसेच गणेशवाडी (ता. इंदापूर) येथील भीमा नदीवरील पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद आहे.
उजनी धरणातून भीमा नदीमध्ये मंगळवारी (दि. 27) सायंकाळी 6 वाजता 81 हजार 600 क्युसेक एवढा विसर्ग कायम आहे. त्यामुळे भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणू, शेवरे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सध्या धरणामध्ये पाणीसाठा 121.20 टीएमसी आहे. धरण 107.40 टक्के क्षमतेने भरले आहे. दौंड येथून उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग हा 66 हजार 671 क्युसेक आहे.
गणेशवाडी येथील भीमा नदीवरील पूल सोमवारी सायंकाळपासून पाण्याखाली गेला आहे. मंगळवारी दिवसभर पुलावर दोन ते तीन फूट पाणी होते. त्यामुळे माढा (जि. सोलापूर) तालुक्यातील कोंढरपट्टा भागातील गावांचा बावडा (ता. इंदापूर) व अकलूज (ता. माळशिरस) या पुलावरून होणारा संपर्क तुटला आहे. इंदापूर अथवा नरसिंहपूरमार्गे वळसा घालून त्यांना ये-जा करावी लागत आहे.
निरा नदीमध्ये वीर धरणातून मंगळवारी (दि.27) सकाळपासून 61 हजार 924 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. या विसर्गामध्ये दुपारी तीननंतर काहीशी घट करून विसर्ग 55 हजार 197 क्युसेक करण्यात आला. सध्या निरा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, दोन्ही नद्यांना पूरस्थिती असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.